पुणे : तब्बल १२ हजार कोटी खर्च करून शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठी सुरू केलेल्या मेट्रो प्रकल्पाअंतर्गत प्रवाशांना चांगली स्वच्छतागृहे आणि पिण्यासाठी पाणीही उपलब्ध करून देता येत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मागील तीन महिन्यांपासून येरवडा स्थानकात पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्याउलट महामेट्रोने या सुविधेचे खापर थेट महापालिका प्रशासनावर फोडले असून, महापालिकेकडून स्थानकासाठी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने पाणी देता येत नसल्याचे तक्रारदारांना सांगण्यात येत आहे. काय आहे प्रकार? पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावर येरवडा येथे गुंजन चौकात मेट्रोचे स्थानक आहे. या भागात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते, तसेच विश्रांतवाडी, विमानतळाकडे जाणारे प्रवासी शहरातून आणि पिंपरी-चिंचवडकडून या भागात येतात. मागील तीन महिन्यांपासून या स्थानकांवर नागरिकांना पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे मेट्रोचे प्रवासी असलेल्या संजय शितोळे यांनी मेट्रो प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतरही काहीच होत नसल्याने शितोळे यांनी महामेट्रोच्या तक्रार निवारण प्रणालीवर फोन केला असता, पुणे महापालिकेकडून दूषित पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे हे पाणी बंद केले असल्याचे सांगण्यात आले. स्वच्छतागृहांची दुरवस्था महामेट्रोच्या स्वच्छतागृहांबाबतही नागरिकांकडून अनेक तक्रारी करण्यात येत आहेत. अनेकदा स्वच्छतागृहात अस्वच्छ पाणी असते. सिंकला पाणी नसणे, हात धुण्यासाठी साबण नसणे, तसेच इतर वस्तूंची दुरवस्था झालेली असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या पुणे रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतागृहाचे फोटो प्रवाशांनी व्हायरल केले होते. त्यामुळे महामेट्रोकडून प्रवाशांना स्वच्छता, पाणी यांसारख्या सुविधा तरी व्यवस्थित देण्याची मागणी केली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरातील आमदार, खासदार, मेट्रो अधिकाऱ्यांनी पाणी पिले नाही का? त्यांना त्यांच्या मालकांना पाण्याची व्यवस्था नाही, हे माहिती आहे का? मेट्रो स्टेशनवरील अधिकाऱ्यांनी सांगितले, की आम्हीही तक्रारी केल्या आहेत; पण काहीही झालेले नाही. – संजय शितोळे, मेट्रो प्रवासी