Ship Hijacking : 22 भारतीय नागरिक असलेल्या दोन जहाजांचे अपहरण; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
Ship Hijacking : यमन आणि सोमालियाजवळ समुद्री चाच्यांनी दोन व्यावसायिक जहाजांचे अपहरण केले. दोन्ही जहाजांवर 22 भारतीय नागरिक असून ते सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

Ship Hijacking : यमन आणि सोमालियाच्या किनाऱ्याजवळ समुद्री लुटारूंनी दोन व्यावसायिक जहाजांचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही जहाजांवर एकूण 30 क्रू सदस्य होते. त्यापैकी 22 जण भारतीय नागरिक आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी या घटनेला दुजोरा दिला.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अपहरण करण्यात आलेली दोन्ही जहाजे परदेशी ध्वज असलेली आहेत. MT Sibu 1 या जहाजावर 16 भारतीय नागरिक, तर M/V Lutuf या जहाजावर 6 भारतीय नागरिक होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही जहाजांवरील सर्व 22 भारतीय नागरिक सध्या सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी भारत सरकार संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचे जायसवाल यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या कारवाईवर भारताचा पलटवार –
यावेळी रणधीर जायसवाल यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायोगाच्या परिसरातील काही संरचना हटविल्याच्या मुद्द्यावरही भारताची भूमिका स्पष्ट केली. भारताने विनंती करूनही पाकिस्तानकडून भारतीय उच्चायोग परिसरातील काही बांधकामे जबरदस्तीने हटविण्यात आली.
या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही नवी दिल्लीत पाकिस्तानी उच्चायोगाबाहेरील रस्त्याच्या लेनमध्ये उभारलेल्या काही तात्पुरत्या संरचना हटवल्या आहेत.
भारताने पाकिस्तानच्या कारवाईला अनुचित ठरवत कूटनीतिक पातळीवर त्याला उत्तर दिले आहे. भारतीय उच्चायोगातील संरचना हटविण्याला विरोध करूनही पाकिस्तानने कारवाई केल्याने भारतानेही त्याच धर्तीवर ही कारवाई केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.





