Pune News | कोकणसह विदर्भाला यलो अलर्ट..

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील कोकण किनारपट्टीवर पुढील दोन ते तीन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असून, विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे कोकण आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर ओसरला असून, कोकण-गोवा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात, तर मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात पावसाच्या मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण- गोव्यात बहुतांश भागात विदर्भात बऱ्याच, मध्य महाराष्ट्रात काही, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
दरम्यान, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट विभागातही पावसाचा जोर ओसरल्याने गेल्या २४ तासांत दावडी परिसरात सर्वाधिक ८७ मिमी पावसाची नोंद झाली. शिरगाव येथे ८०, ताम्हिणी घाटमाथ्यावर ६०, तर लोणावळा परिसरात ५७ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.





