YCMOU Admission : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात व्यावसायिक अभ्यासक्रमांची चलती , प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना येत्या१५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यापीठाच्या १३८ वेगवेगळ्या प्रकारच्या पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे. दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवीसोबत दुरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी मिळवता येईल. तसेच मुक्त विद्यापीठाच्याच दोन पदव्यांना एकाचवेळी प्रवेश घेता येणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी विद्यापीठाने पारंपारिक शिक्षणक्रमांसह नवीन आणि व्यावसायिक शिक्षणक्रमही सुरु केलेले आहेत. त्यात विशेषतः संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान, कृषी तसेच व्यावसायिक क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन डेटा ॲनालिटिक्स, आयबीएम सर्टिफिकेट, डिजिटल फोटोग्राफी, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, श्वानपालक प्रबोधन, सौर व पवन उर्जा आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना घरबसल्या आणि त्यांच्या सवडी, आवडीनुसार शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठ दूरस्थ शिक्षण प्रणालीतून उपलब्ध करून देते. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा विद्यापीठाच्या नजीकच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा.





