Yavat : मशिदीची तोडफोड, जाळपोळ…; यवत गावात पुन्हा तणावाची ठिणगी, ‘त्या’ एका पोस्टमुळे झाला राडा

Yavat News | Social Media Post | Violence : पुणे जिल्ह्यातील यवत गावात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) सकाळी यवतमधील एका मुस्लिम युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली.
या घटनेनंतर काही तासांतच, दुपारी १२ वाजेनंतर यवतचा आठवडे बाजार बंद करण्यात आला, आणि परिसरात तणाव वाढू लागला. तर दुसरीकडे यवत मध्ये काही दुचाकी गाड्या पेटवून देण्यात आल्या असून मस्जिदची देखील तोडफोड करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे सध्या यवत गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे 26 जुलै रोजी यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेचा संताप अद्याप शमलेला नसतानाच, अवघ्या काही दिवसांतच दुसरा वादग्रस्त प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात वातावरण निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करणारा युवक यवत भागातील सहकार नगर भागात राहत असून स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार नगर भागात धाव घेत त्याच्या घराची तोडफोड देखील केली आहे.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला असला तरी युवकाच्या घराची हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तातडीने बंदोबस्त वाढवला आहे.
तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून, नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास न ठेवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





