Yavat News | जमावबंदीचा बाजारपेठेला मोठा फटका ; तब्बल दोन कोटींचे आर्थिक नुकसान..

प्रभात वृत्तसेवा
यवत – दौंड तालुक्यातील यवत येथे झालेल्या वादविवादच्या घटनेमुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जमावबंदी करण्यात आली होती. त्यामध्ये तीन दिवसांची जमावबंदी आदेश देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा दोन परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे सकाळी ६ ते ११ पर्यंत अंशत: शिथिलता करण्यात आली होती. एकूण पाच दिवस जमावबंदी असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापारी, किराणा दुकानदार, दुचाकी चार चाकीचे फिटर, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, हार्डवेअर, चालक, हॉटेल्स, सोबत कापड व्यावसायिक आणि आणि छोटे सीझनेबल व्यावसायिक यांचे जवळपास दोन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
यवत गाव हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास २२ हजाराच्या आसपास आहे. वाहतूक दळणवळणाच्या दृष्टीने यवत गाव हे व्यापारी आणि शेतकरी, छोटे व्यावसायिक यांच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. यवत गावात जवळपासच्या खामगाव, कासुर्डी, भरतगाव, खुटबाव, यवत लडकतवाडी, गाडमोडी, तांबेवाडी, नाथाचीवाडी, भांडगाव, उंडवडी, भोसलेवाडी आदी जवळपासच्या १० -२० गावांतील शेतकरी आपला भाजीपाला शेतमाल यवत येथे विक्रीसाठी आणत असतात.
महामार्गवरील मोठे गाव असल्याने याठिकाणी हॉटेल्स व्यावसायिक, दुचाकी चारचाकी दुरुस्ती करणारे फिटर, सलून दुकान, फळविक्रेते, हार्डवेअर कापड व्यावसायिक हे यवतमधील साहित्य व मालाची खरेदी विक्री करण्यासाठी यवतच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात.यवत बाजारपेठेत सीझनेबल छोटे व्यावसायिक देखील आहेत. यामध्ये भाजीपाला विक्री करणारे व सणासुदीचा साहित्य विक्री करणाऱ्या व्यवसायिकानी लाखो रुपयांचा माल खरेदी केला. मात्र, यवत येथे घडलेल्या प्रकारामुळे छोट्या व्यवसायिकासहित मोठे व्यापारी यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जवळपास यवत बाजारपेठेत होणारी जवळपास २ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ही थांबली होऊन मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस दप्तरी कायमचीच नोंद..
यवत येथे सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर संतप्त जमावाने प्रार्थनास्थळावर दगडफेक केली. यात मोठे नुकसान करीत घरांवर दगडफेक केली. जिल्हाधिकारी यांनी यवतमध्ये जमावबंदीचे आदेश दिले. गेल्या पाच दिवसांनंतर वातावरण पूर्वपदावर आले आहे. मात्र, यवत गावाची नोेंद आता पोलीस दप्तरी ही कायमचीच नोंद झाली आहे. संवेदनशील गाव अशी नोंद नेहमीच रेकार्डवर राहणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त झाल्या आहेत.




