प्रभात वृत्तसेवा यवत – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत (ता. दौंड) जवळ शेरु हॉटेलसमोर भरधाव स्विफ्ट गाडीने दुभाजक ओलांडून दोन वाहनांवर जाऊन आदळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार (दि.२०) रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. अशोक विश्वनाथराव थोरबोले (वय ५७, रा. उरळी कांचन ता. हवेली), गणेश धनंजय दोरगे (वय २८ रा. यवत, रावबाचीवाडी ता. दौंड), अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींची नावे समजू शकली नाहीत. स्विफ्ट गाडीचालक राकेश मारूती भोसले (रा. बोरीभडक ता. दौंड जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट गाडीने रस्त्याचे दुभाजक तोडून पलीकडून विरुद्ध बाजूला जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी यावेळी सांगितले.घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.२०) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ज्ञानेश्वर थोरबोले हे पुणे- सोलापूर रस्त्याने चारचाकी गाडीतून धाराशिववरून उरूळी कांचनकडे जात होते. त्यांची गाडी यवत गावच्या पुढे शेरू हॉटेल येथे आली असता राकेश भोसले याच्या भरधाव स्विफ्ट कारने महामार्गावरील दुभाजक ओलांडून गाडी विरुद्ध दिशेला समोरून येणाऱ्या दोन वाहनांवर जोरदार आदळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर वाहन चालवत असलेले थोरबोले हे जखमी झाले. यात दोन गाड्यांतील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. थोरबोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी राकेश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.