Yasuo Fukuda : जपानचे माजी पंतप्रधान यासुओ फुकुदा यांचे निधन
जपानचे माजी पंतप्रधान यासुओ फुकुदा (Yasuo Fukuda) यांचे निधन झाले असल्याचे सोमवारी जाहीर केले गेले. ते ९० वर्षांचे होते.

Yasuo Fukuda : जपानचे माजी पंतप्रधान यासुओ फुकुदा (Yasuo Fukuda) यांचे निधन झाले असल्याचे सोमवारी जाहीर केले गेले. ते ९० वर्षांचे होते. फुकुदा यांचे निधन गुरुवारीच झाले असल्याचे सत्तारुढ लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्यावतीने सांगितले गेले. मात्र फुकुदा यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि अन्य कोणताही तपशील जाहीर केला गेला नाही.
फुकुदा (Yasuo Fukuda) हे अवघ्या एका वर्षासाठी जपानचे पंतप्रधान होते आणि या काळात त्यांनी चीनबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या भुमिकेमुळे ते वादातही सापडले होते. त्यांचे वडील ताकेओ फुकुदा यांनीही पंतप्रधान म्हणून काम केले आणि चीनसोबत जपानचे संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले होते. तरुणपणी तेल कंपनीत १७ वर्षे नोकरी केल्यानंतर यासुओ फुकुदा राजकारणात आले.
फुकुदा (Yasuo Fukuda) १९९० मध्ये त्यांच्या वडिलांच्याच मतदारसंघातून पहिल्यांदा संसदेवर निवडून आले. त्यांना मुख्य कॅबिनेट सचिव म्हणून पहिले मंत्रीपद मिळाले. २००७ – २००८ या एका वर्षासाठीच त्यांना पंतप्रधानपद मिळाले. याकाळात त्यांना अर्धवट बहुमत असलेल्या संसदेचे कामकाज सांभाळताना संघर्ष करावा लागला. त्यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाकडे दोनपैकी फक्त एकाच सभागृहात बहुमत होते. २००८ मध्ये त्यांना अचानक राजीनामा द्यावा लागला होता.






