India Squad Change : टी-२० मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! गंभीरचा लाडका खेळाडू बाहेर; विदर्भाच्या खेळाडूची लागली लॉटरी
India Squad Change : अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. तो कोणता आहे? जाणून घेऊया.

Yash Thakur Replaces Injured Harshit Rana India T20 Squad Asian Games 2026 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा विश्वासू वेगवान गोलंदाज मानला जाणारा हर्षित राणा दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी निवड समितीने विदर्भाचा युवा वेगवान गोलंदाज यश ठाकूरला (Yash Thakur) भारतीय संघात संधी दिली आहे. केवळ अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीच नाही, तर आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) साठीही यश ठाकूरची थेट संघात वर्णी लागली आहे.
१३ सप्टेंबरला दिल्लीत सलामीचा सामना; हर्षित राणाला सरावादरम्यान दुखापत – (India Squad Change)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना १३ सप्टेंबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, हर्षित राणा ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये पुनर्वसनाच्या प्रक्रियेत होता. त्याची प्रगती समाधानकारक होती; मात्र ७ सप्टेंबर रोजी मॅच सिम्युलेशनदरम्यान गोलंदाजी करताना त्याच्या उजव्या मांडीतील ‘रेक्टस फेमोरिस’ स्नायूला गंभीर दुखापत झाली. वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यानंतर त्याला किमान काही आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला, ज्यामुळे तो या दोन्ही मोठ्या स्पर्धांमधून बाहेर फेकला गेला.
फिटनेसचा जुगार फसला; निवड समितीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह – (India Squad Change)
🚨 News 🚨
Yash Thakur replaces Harshit Rana in India’s T20Is squads for Afghanistan T20Is & Asian Games
More Details ▶️ https://t.co/qh86ExSbgB #TeamIndia | #AFGvIND | #AsianGames
— BCCI (@BCCI) September 10, 2026
श्रीलंका दौऱ्यापासून बीसीसीआय निवडकर्ते अनफिट खेळाडूंना ‘फिटनेसच्या अधीन’ ठेवून संघात निवडण्याचा धोका पत्करत आहेत. अफगाणिस्तान मालिकेसाठीही जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांची निवड फिटनेस टेस्टच्या आधारावरच झाली होती. मात्र, हर्षित राणाच्या बाबतीत निवड समितीचा हा डाव पूर्णपणे फसला. अखेर घाईघाईने शेवटच्या क्षणी संघात बदल करून पर्यायी गोलंदाज जाहीर करावा लागला.
झिम्बाब्वे दौऱ्यावर चमकदार पदार्पण; आशियाई स्पर्धेतही यश ठाकूरला सुवर्णसंधी – (India Squad Change)
विदर्भाच्या यश ठाकूरने जुलै महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्या दौऱ्यात त्याने दोन सामन्यांत ४ विकेट्स टिपत सर्वांचे लक्ष वेधले होते. आता घरच्या मैदानावर होणाऱ्या टी-२० मालिकेत आणि त्यानंतर जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याला आपली क्षमता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशियाई स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे.





