पुणे जिल्हा | यशचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू

शिक्रापूर, (वार्ताहर)- दहिवडी (ता. शिरुर)- येथील मांजरेवस्ती येथे (दि.२१) जून रोजी यश शरद गायकवाड या दहा वर्षीय बालकाचा उसाच्या शेतात मृतदेह आढळला. घटनेनंतर बिबट्याने बालकाला शेतात नेल्याची अफवा पसरली होती. वनविभाग वीस दिवसांपासून बिबट्याला जेरबंद करण्यात गुंतले असताना बालकाचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे.
दहिवडी येथील मांजरेवस्ती येथे यश गायकवाड हा दुपारी घराच्या पाठीमागे शौचास गेला होता. बराच वेळ तो दिसून न आल्याने घरच्यांसह नागरिकांनी त्याचा शोध घेतला. सायंकाळी सहाच्या सुमारास यशचा मृतदेह उसाच्या शेतात मिळून आला. यशला बिबट्याने उसाच्या शेतात नेल्याचे बोलले जाऊ लागले.
यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. कोठेही बिबट्याच्या पावलाचे ठसे मिळून आले नाहीत. यशच्या शरीरावर आढळून आलेल्या जखमा संशयास्पद वाटून आल्याने खळबळ उडाली. यशच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट होते.
मृतदेहाचे विच्छेदन ससूनमध्ये करण्यात आले. जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक अमित भिसे, शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे प्रमुख डॉ. महेंद्र ढोरे आदींनी घटनास्थळी पाहणी केली.
पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे आदींनी भेट देऊन पाहणी करीत श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, बालकाला झालेल्या जखमा आणि परिसरातील बिबट्याचे नसलेले ठसे यामुळे बालकाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात की घातपात समजू शकत नव्हते.
अद्यापपर्यंत तब्बल अठरा दिवस वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यू टीम मेंबर घटनास्थळी ठाण मांडून पिंजरे लावून चोवीस तास पहारा देत होते. एकदाही बिबट्या निदर्शनास आला नाही. मात्र, सध्या यशचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला असताना डोक्याला मार लागल्याने मृत्यू असे कारण आले. अजूनही स्पष्ट भूमिका पोलीस घेत नसल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत.
व्हीसेरा राखून ठेवला
दहिवडी येथील यश याच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्याबाबतचा व्हीसेरा राखून ठेवलेला आहे, मात्र, डोक्याला मार लागल्याने मृत्यू, असे अहवालात म्हटले आहे. डोक्याला मार कशामुळे लागला ही माहिती मिळावी, अशी मागणी ससूनकडे केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी सांगितले.
शिक्रापूर पोलिसांची टाळाटाळ
शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप म्हणाले, दहिवडीमधील घटनेबाबत पहिल्या दिवसापासून बिबट्याचा हल्ला नसल्याचे आम्ही बोलत आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होत नसल्याने आम्ही ससूनला गेलो असता शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे दिला आहे. डोक्याला मार लागल्याने मृत्यू, असे नमूद असल्याचे समजले.
मात्र, याबाबत मागणी करुन पोलीस अद्यापपर्यंत आमच्याकडे शवविच्छेदन अहवाल नोट देत नसून पोलीस या गंभीर प्रकरणात टाळाटाळ करीत आहे.
वनविभागाचे अठरा दिवस कष्ट वाया
दहिवडी येथे यश गायकवाड याच्याबाबत घटना घडल्यापासून आतापर्यंत अठरा दिवस वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यू टीम मेंबर घटनास्थळी ठाण मांडून पिंजरे लावून चोवीस तास पहारा देत होते. त्यांना अद्याप बिबट्या निदर्शंनास आला नाही. यश याचा मृत्यू डोक्याला मार लागल्याचे अहवालातून निष्पन्न झाल्याने वनविभागाचे अठरा दिवस कष्ट वाया गेले आहेत.





