Yamuna Expressway : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू
बुधवारी रात्री उशिरा ग्रेटर नोएडा येथील यमुना एक्सप्रेसवेवर (Yamuna Expressway) सुमारे ३५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्लीपर बसला आग लागल्याने किमान नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला.

Yamuna Expressway : बुधवारी रात्री उशिरा ग्रेटर नोएडा येथील यमुना एक्सप्रेसवेवर (Yamuna Expressway) सुमारे ३५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्लीपर बसला आग लागल्याने किमान नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. या जीवघेण्या अपघातातून २० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना रात्री ११ च्या सुमारास घडली जेव्हा बस गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवरजवळ होती.
मुख्य अग्निशमन अधिका-यांनी पीटीआयला सांगितले की, बीआर३२- पीए 8647 नोंदणी क्रमांक असलेली ही बस नवी दिल्लीतील (Yamuna Expressway) काश्मिरी गेटवरून महोबाच्या दिशेने जात असताना ३३-किमी मैलाच्या दगडाजवळ (माईलस्टोन) तिला आग लागली. आगीने बसला वेगाने विळखा घातला, ज्यामुळे अनेक प्रवाशांना खिडक्यांमधून बाहेर पडावे लागले.
आणीबाणीचा कॉल मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रवाशांची सुटका करण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर प्रयत्न केले. त्यामध्ये २० हून अधिक प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, जेव्हा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान धुराने भरलेल्या बसमध्ये शिरले, तेव्हा त्यांना आत नऊ जण मृत अवस्थेत आढळले.
आगीमुळे भाजल्याने किंवा गुदमरल्याने या प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. प्राथमिक तपासावरून असे दिसून येते की बसच्या (Yamuna Expressway) एअर-कंडिशनिंग प्रणालीमधील ठिणगी किंवा स्फोटामुळे इंजिनमधील वंगण तेलाने (लुब्रिकंट ऑईल) पेट घेतला असावा, ज्यामुळे आग वेगाने पसरली. मृत्यू झालेल्या नऊ जणांची ओळख पटवण्याचे काम पोलीस आता करत आहेत. बस चालक आणि वाहकाला अटक करण्यात आली असून, जेवर पोलिसांनी त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींवर योग्य उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी बसला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. तसेच, या अपघातात जखमी झालेल्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेसवेवर बसला (Yamuna Expressway) लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. मी शोकाकुल कुटुंबीयांबद्दल माझ्या संवेदना व्यक्त करते. या अपघातात जखमी झालेले लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करते, असे मुर्मू यांनी म्हटले आहे.






