उत्तर प्रदेश : उत्तरप्रदेशमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अलिगडमधील टप्पल पीएस भागात काल रात्री उशिरा ट्रक आणि व्होल्वो बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस दिल्लीहून आझमगडच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि बचाव पथकांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने जेवर येथील कैलास रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघातानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. मुख्यमंत्री योगींनी घेतली दखल अलिगड दुर्घटनेची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.