Rahuri by-election : 23 एप्रिल या दिवशी बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 6 मे या दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. दोन्ही ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात असतानाच वंचित बहुजन आघाडीने राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला आहे. वंचितने नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला वंचितकडून उमेदवारी जाहीर केली आहे. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, तडफदार व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मतदारसंघातील जनतेने एकदिलाने काम करून अनिल जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आघाडीकडून उमेदवार असणार? दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या हाचलाली सुरू केल्या आहेत. लवकरच अधिकृत नावाची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे आघाडीकडून कोणता उमेदवार दिला जाणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा : Akshardham Temple New Jersey: अमेरिकेतील भव्य अक्षरधाम मंदिर वादात; मजुरांच्या शोषणाचे गंभीर आरोप