Akshardham Temple New Jersey: अमेरिकेतील बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. न्यू जर्सीमधील रॉबिन्सविले येथे बांधलेले हे मंदिर २०२३ मध्ये मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले होते. भारताबाहेरील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून याची ओळख आहे. मात्र आता या मंदिराच्या बांधकामाशी संबंधित मजुरांनी केलेल्या आरोपांमुळे हा प्रकल्प चर्चेत आला आहे. हे मंदिर बीएपीएस स्वामीनारायण संस्था यांनी उभारले आहे. मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानसह भारतातील अनेक भागांतून कारागीर आणि मजूर नेण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, या कामासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. मजुरांच्या म्हणण्यानुसार, २०१५ ते २०२३ या काळात काम करताना त्यांचे शोषण झाले. त्यांनी व्हिसा फसवणूक, कमी पगार, जास्त कामाचे तास आणि आरोग्य सुविधांचा अभाव यासारखे गंभीर आरोप केले आहेत. काही मजुरांनी सांगितले की, त्यांच्याकडून आठवड्यात तब्बल ९० तास काम करून घेतले जात होते, पण त्यांना तासाला फक्त १.२० डॉलर इतकाच मोबदला दिला जात होता. याशिवाय, काही मजुरांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले होते आणि त्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची परवानगीही नव्हती, असेही आरोप करण्यात आले आहेत. आजारी पडल्यावर योग्य वैद्यकीय उपचार न दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. BAPS Swaminarayan Akshardham या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे काही मजुरांचा मृत्यू. रिपोर्टनुसार, सिलिकोसिस या फुफ्फुसांच्या आजारामुळे दोन मजुरांचा मृत्यू झाला. हा आजार दगड घासताना निर्माण होणाऱ्या सिलिका धुळेमुळे होतो. याशिवाय इतर अनेक मजुरांना श्वसनाचे त्रास, क्षयरोग (टीबी) आणि क्रॉनिक ब्रॉन्कायटिससारख्या आजारांचा सामना करावा लागला. मात्र मंदिर प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. संस्थेच्या म्हणण्यानुसार, मजुरांना काम सुरू करण्यापूर्वी सुरक्षेसाठी आवश्यक साधने जसे की मास्क, हातमोजे आणि बूट देण्यात आले होते. तसेच कामगारांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. मंदिर प्रशासनाने ‘मिनिस्टीरियल एक्सेप्शन’ या कायद्याचा आधार घेतला आहे, ज्यामुळे धार्मिक संस्थांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपावर काही मर्यादा येतात. वादाच्या केंद्रस्थानी असलेले हे मंदिर मात्र आपल्या भव्यतेसाठीही ओळखले जाते. सुमारे १८५ एकर क्षेत्रात पसरलेले हे मंदिर १९१ फूट उंच आहे. मंदिरातील दगड बुल्गारिया, इटली, ग्रीस, तुर्की आणि भारतासह अनेक देशांतून आणण्यात आले आहेत. मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारत यांसारख्या भारतीय कथा कोरलेल्या आहेत. मंदिरासमोर असलेल्या ब्रह्मकुंडात जगभरातील सुमारे ४०० नद्या आणि तलावांचे पाणी आणले गेले आहे. यात भारतातील गंगा आणि यमुना नद्यांचेही पाणी समाविष्ट आहे. एकूणच, जगभरातील श्रद्धेचे केंद्र असलेले हे मंदिर सध्या मजुरांच्या आरोपांमुळे वादात सापडले असून, या प्रकरणाची चौकशी आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.