X Platform: ‘कॉपी-पेस्ट’ कंटेंटवर एक्सची मोठी कारवाई; आता ओरिजिनल क्रिएटर्सनाच मिळणार कमाईचा फायदा
X Platform एलन मस्क यांच्या मालकीच्या एक्स प्लॅटफॉर्मने हा नवीन नियम लागू करताना स्पष्ट केले आहे की, ओरिजिनल कंटेंट तयार करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि प्लॅटफॉर्मवरील कंटेंट चोरी थांबवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

X Platform: X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कंटेंट चोरी करणाऱ्या अकाउंट्सविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. आता इतरांचे व्हायरल व्हिडीओ, मीम्स किंवा पोस्ट कॉपी करून स्वतःच्या अकाउंटवर अपलोड करणाऱ्यांना मोनेटायझेशनचा फायदा मिळणार नाही. याऐवजी त्या कंटेंटमधून होणारी कमाई आणि जास्तीत जास्त व्ह्यूज थेट मूळ क्रिएटरलाच मिळणार आहेत.
एलन मस्क यांच्या मालकीच्या एक्स प्लॅटफॉर्मने हा नवीन नियम लागू करताना स्पष्ट केले आहे की, ओरिजिनल कंटेंट तयार करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि प्लॅटफॉर्मवरील कंटेंट चोरी थांबवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ( X Platform)
सोशल मीडियावर अनेकदा असे दिसते की एखादा छोटा क्रिएटर मेहनत घेऊन व्हिडीओ किंवा मीम तयार करतो. मात्र काही मोठे अकाउंट्स तेच कंटेंट डाउनलोड करून स्वतःच्या पेजवर पुन्हा अपलोड करतात. अशा अकाउंट्सकडे फॉलोअर्स जास्त असल्याने त्यांना अधिक व्ह्यूज आणि जास्त कमाई मिळते. तर मूळ क्रिएटरला ना योग्य क्रेडिट मिळते, ना आर्थिक फायदा. या प्रकाराला सोशल मीडियामध्ये “कॉपीकॅट इकॉनॉमी” असे म्हटले जाऊ लागले होते.
आता एक्सने या समस्येवर उपाय म्हणून आपल्या अल्गोरिदममध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीशी संबंधित निकिता बियर यांनी सांगितले की, प्लॅटफॉर्म आता अशा अकाउंट्सची ओळख करू शकतो जे ऑटोमॅटिक टूल्स किंवा सॉफ्टवेअर वापरून इतरांचे व्हिडीओ चोरून पुन्हा अपलोड करतात. (X Platform)

x platform
नवीन अपडेटनुसार, जर कोणी दुसऱ्याचा व्हिडीओ कॉपी करून पोस्ट केला तर त्या व्हिडीओमधून मिळणारे बहुतेक इम्प्रेशन्स आणि कमाई मूळ क्रिएटरच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल. त्यामुळे केवळ इतरांचा कंटेंट वापरून पैसे कमावणाऱ्या पेजेसची रीच आणि उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे.
तथापि, एक्सने हेही स्पष्ट केले आहे की इतरांच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देणे किंवा चर्चा करणे बंद केले जाणार नाही. युजर्स अजूनही ‘शेअर व्हिडीओ’ किंवा ‘कोट’ फीचरचा वापर करून प्रतिक्रिया देऊ शकतात. मात्र, व्हिडीओ डाउनलोड करून पुन्हा अपलोड करण्याऐवजी अधिकृत पद्धतीने शेअर करणे आवश्यक असेल.
जर एखाद्या युजरने व्हिडीओ कोट करून त्यावर स्वतःचे मत, विश्लेषण किंवा माहिती जोडली, तर त्या पोस्टलाही काही प्रमाणात रीच मिळू शकते. पण मूळ व्हिडीओची कमाई आणि मुख्य फायदा मूळ क्रिएटरलाच दिला जाईल. (X Platform)
दरम्यान, ‘शेअर व्हिडीओ’ फीचरमध्ये असलेल्या एका तांत्रिक त्रुटीवरही कंपनी काम करत आहे. २८० अक्षरांपेक्षा मोठी पोस्ट लिहिल्यास व्हिडीओ लिंकमध्ये बदलत असल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली होती. कंपनीने हा बग लवकरच दुरुस्त केला जाईल, असे सांगितले आहे.





