WTC Points Table : मालिका विजयासह बांगलादेशची मोठी झेप तर पाकची अवस्था फारच वाईट, ‘या’ संघांना बसला फटका..

World Test Championship Points Table 2023-25 : पाकिस्तान क्रिकेट सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला बांगलादेशी संघ इतिहास रचून परतेल, असे साधारण महिनाभरापूर्वीपर्यंत कुणालाही वाटले नसेल. पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशकडून कसोटी सामन्यात पराभव स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पहिली कसोटी 10 गडी राखून गमावल्यानंतरही पाकिस्तानला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी होती, पण शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघाला असे करता आले नाही आणि त्यांनी सलग दोन सामने गमावले. या सामन्यानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC पॉइंट टेबलमध्ये बरेच बदल दिसत आहेत. पाकिस्तानी संघाची सतत घसरण होत असताना बांगलादेश संघाने मात्र गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. पाकिस्तानचा पराभव आणि बांगलादेशच्या विजयाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील समीकरणे बदलली आहेत.
बांगलादेश पोहोचला चौथ्या स्थानावर..
बांगलादेशने पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 10 गडी राखून मोठ्या विजयाची चव चाखली होती. आता दुसऱ्या सामन्यात त्यांना 6 गडी राखून विजय मिळवताना डब्ल्यूटीसी गुणतालिकेत त्याचा फायदा झाला आहे. गुणांच्या टक्केवारीनुसार गुणतालिका तयार केली जाते. ज्यामध्ये बांगलादेश आता 45.83 टक्के गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे. या यादीत बांगलादेश आता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांच्या पुढे गेला आहे. जर आपण बांगलादेशबद्दल बोललो तर रावळपिंडीतील पहिल्या कसोटीपूर्वी या संघाची गुणांची टक्केवारी 35.0 होती आणि संघ सहाव्या स्थानावर होता.
बांगलादेश फायनल खेळू शकेल का?
दोन बॅक टू बॅक टेस्ट मॅच जिंकून बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पण संघाला येथूनही बाकीचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. पण हे खूप अवघड काम वाटतंय. बांगलादेश संघ काही आठवड्यांत भारतासोबत 2 कसोटी सामने खेळणार आहे, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
With a 2-0 sweep, Bangladesh jump up to fourth place on the latest WTC table 📈https://t.co/nr7fik2CWN #PAKvBAN pic.twitter.com/ow6ZwlLAEf
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 3, 2024
पाकिस्तानची वाईट स्थिती…
पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे कारण जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू सत्रात पाकिस्तानने 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. परिस्थिती अशी आहे की पाकिस्तान संघाची गुणांची टक्केवारी आता केवळ 19.05 आहे आणि ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरले आहेत. पाकिस्तानला अजूनही इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि नंतर वेस्ट इंडिजसोबत कसोटी मालिका खेळायची आहे, पण त्यात विजय मिळवूनही पाकिस्तानला अंतिम फेरीचा मार्ग मोकळा करता येणार नाही. पाकिस्तानसाठी दिलासादायक बाब म्हणजे अद्याप ते शेवटच्या स्थानावर पोहचलेले नाहीत. एकूण 9 देशांच्या या स्पर्धेत वेस्ट इंडिज शेवटच्या स्थानावर आहे, ज्याची गुणांची टक्केवारी सध्या 18.52 आहे. म्हणजे दोन्ही संघांची अवस्था जवळपास सारखीच आहे.
टीम इंडिया अव्वल स्थानावर कायम…
सध्या भारताच्या गुणांची टक्केवारी 68.52 आहे, त्यामुळे टीम इंडिया सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला न्यूझीलंड (50 टक्के) खूप मागे आहे, त्यामुळे 2023 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती होऊ शकते असे दिसते.
इंग्लंड आणि द. आफ्रिकेचे नुकसान…
पाकविरूध्द बांगलादेशच्या विजयामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे नुकसान झाले आहे. इंग्लंडचा संघ आता 45.0 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर घसरला आहे आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ 38.89 टक्क्यांसह 6व्या क्रमांकावर घसरला आहे.





