WTC 2025 Final : १४५ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच ‘हे’ पाहायला मिळाले, लॉर्ड्स स्टेडियम बनले साक्षीदार
Updated On:

WTC 2025 Final Day 1 Bowlers Dominate at Lord’s : आयसीसी डब्ल्यूटीसी २०२५ च्या फायनलचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवशी गोलंदाजांनी १४ विकेट्स घेतल्या. त्यापैकी १२ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. गोलंदाजांना खेळपट्टीवरून खूप मदत मिळत आहे. लॉर्ड्सवर फलंदाजांना धावा काढणे खूप कठीण दिसत आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ २१२ धावांवर ऑलआउट झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवशी १४५ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर असे काही पाहायला मिळाले, जे आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये कधीही पाहिले नव्हते.
५६१ कसोटी सामन्यांमध्ये पहिल्यांदाच हे दृश्य पाहायला मिळालं –
पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या फलंदाजांची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावात दोन्ही संघांचा प्रत्येकी एक सलामीवीर खाते न उघडता बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा आणि दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. १८८० नंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या ५६१ कसोटी सामन्यांमध्ये कोणत्याही संघाचे दोन्ही सलामीवीर कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Frames from a gripping opening day of the Ultimate Test at Lord’s 📸🥵#SAvAUS #WTC25 pic.twitter.com/sHyplzkfxT
— ICC (@ICC) June 11, 2025
याशिवाय, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही १०वी वेळ आहे जेव्हा दोन्ही संघांचे सलामीवीर पहिल्या डावात शून्यावर बाद झाले आहेत. शेवटचे असे २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेदरम्यान दिसून आले होते. जेव्हा ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर आणि इंग्लंडचे रोरी बर्न्स पहिल्या डावात खाते न उघडता बाद झाले होते.
हेही वाचा – WTC Final 2025 : कागिसो रबाडाचा विक्रमी धमाका; डब्ल्यूटीसी फायनलमध्ये डोनाल्डला टाकलं मागं!
ऑस्ट्रेलियाने पकड केली घट्ट –
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ आता थोडा दबावाखाली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या धोकादायक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेने फक्त ४३ धावांत ४ विकेट्स गमावल्या. टॉप-४ फलंदाजांच्या विकेट्स पडल्यानंतर आफ्रिकन संघ थोडा दबाव जाणवत आहे. दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने ४९ षटकानंतर ५ बाद १२१ धावा केल्या आहेत. सध्या काइल व्हेरेन (११) आणि डेव्हिड बेडिंगहॅम (३९) खेळत आहेत. दक्षिण आफ्रिका अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा ९१ धावांनी मागे आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक २ विकेट घेतल्या, त्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी १-१ विकेट्स घेतल्या.





