ICC WTC Points Table 2025 Ranking : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना नॉटिंगहॅम येथे खेळला गेला. इंग्लिश संघाने ही कसोटी 241 धावांनी जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. इंग्लंडने पहिली कसोटी एक डाव आणि 114 धावांनी जिंकली होती. तर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 26 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. सलग दोन कसोटी विजयांसह इंग्लंड संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. नुकतेच आयसीसीने ताज्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे पॉइंट टेबल जाहीर केले आहे. त्यानुसार इंग्लंडचा संघ आता गुणतालिकेत तळाशी नाही आणि थेट सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. बेन स्टोक्सच्या संघाला तिसरी कसोटी जिंकून गुणतालिकेत आपले स्थान आणखी मजबूत करण्याची संधी असेल. इंग्लंडचा संघ थेट नवव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. या दरम्यान त्यानी दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजला मागे टाकले. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ गुणतालिकेत तळाच्या नवव्या स्थानावर पोहोचला आहे. 2023-25 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये इंग्लंडने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी पाच जिंकले आहेत. इंग्लिश संघ सहामध्ये पराभूत झाला आहे. एक कसोटी अनिर्णित राहिली. इंग्लंडचे 45 गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी 31.25 आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजने आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले असून त्यात फक्त एकच विजय मिळवला आहे. त्यांना चार कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक कसोटी अनिर्णित राहिली आहे. वेस्ट इंडिजचे 16 गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी 22.22 आहे. भारत अजूनही अव्वल स्थानावर… जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत अजूनही अव्वल स्थानावर कायम आहे. भारताचे 74 गुण आहेत आणि गुणांची टक्केवारी 68.52 आहे. ऑस्ट्रेलिया 62.50 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या संघात फरक असला तरी तो फारसा नाही. एक सामना जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर यात बदल घडू शकतात. न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा संघ 50 गुणांच्या टक्केवारीसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाचे 36 तर श्रीलंकेच्या संघाचे 24 गुण आहेत. पाकिस्तान 36.66 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ 25 गुणांच्या टक्केवारीसह अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. ENG vs WI 2nd Test : रुट-ब्रूकच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केला कहर, वेस्ट इंडिजला 241 धावांनी केलं पराभूत… वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड पुढील महिन्याच्या अखेरीस घरच्या मैदानावर तीन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंकेचे यजमानपद भूषवेल आणि त्यानंतर ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करेल. या कालावधीत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. वेस्ट इंडिजला आता इंग्लंडविरूध्द (एक) तर दक्षिण आफ्रिका (दोन), बांगलादेश (दोन) आणि पाकिस्तानविरूध्द (दोन) अशा सात कसोटी खेळायच्या बाकी आहेत.