WTC 2023/25 : गाबा कसोटीनंतर ‘डब्लूटीसी’ पॉइंट्स टेबलमध्ये बदल; जाणून घ्या, Final खेळण्यासाठी कोणते संघ आहेत दावेदार…

World Test Championship Points table 2023-2025 : ब्रिस्बेन येथे बुधवारी खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. या निकालामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025) च्या अंतिम फेरीची शर्यत अधिक मनोरंजक बनली आहे. मात्र, या ड्रॉमुळे भारतीय संघाच्या गुणांच्या टक्केवारीवर (पीसीटी) परिणाम झाला असून, अंतिम फेरीचा मार्ग थोडा कठीण झाला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चे सामने जसजसे संपत आहेत, तसतसे या चॅम्पियनशिपचे पॉइंट टेबल देखील बदलत आहे. जेव्हापासून गुणतालिकेची सुरूवात झाली, तेव्हापासून कसोटी क्रिकेट पूर्णपणे बदलले आहे. यामुळेच सर्व संघ WTC अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. अद्याप चालू हंगामात एकही संघ अंतिम फेरीत पोहोचू शकलेला नाही, यावरून WTC चा थरार कळू शकतो. पुढच्या वर्षी फायनल खेळण्यासाठी दावेदार असलेल्या त्या संघांवर एक नजर टाकूया.
1. दक्षिण आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेचा संघ 63.33% च्या विजयाच्या टक्केवारीसह WTC फायनलमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघापैकी एक प्रबळ दावेदार आहे. संघाला आता पाकिस्तानविरुद्ध मायदेशात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, त्यापैकी एक सामना जिंकून ते अंतिम फेरीत प्रवेश करतील. प्रोटीज संघाने नुकतेच घरच्या मैदानावर श्रीलंकेविरूध्दची आणि बांगलादेशविरूध्दची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली होती.
2. ऑस्ट्रेलिया : सध्या, ऑस्ट्रेलियन संघ 58.89% च्या विजयाच्या टक्केवारीसह WTC गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहे. संघाला अजूनही एकूण चार सामने खेळायचे आहेत, त्यापैकी दोन सामने भारताविरुद्ध आहेत. भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील आणखी एका सामन्यात जरी संघ हरला, तरीही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करत त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी असेल.
IND vs AUS 3rd Test : पावसाने केला खेळ खराब, 12 वर्षांनंतर गाब्बामध्ये पहिल्यादांच कसोटी अनिर्णित….
3. भारत : घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 0-3 असा अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाची अवस्था वाईट आहे. संघ बराच काळ शीर्षस्थानी होता, परंतु आता स्थिती बदलली आहे. आता संघाला अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी कांगारू संघाविरुद्धचे पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार असून इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या भारतीय संघ 58.88% च्या विजयाच्या टक्केवारीसह WTC गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.





