ENG vs WI 2nd Test Match Result : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा 241 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. अशाप्रकारे इंग्लंडने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी पहिल्या सामन्यात संघाने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला होता. आता उभय संघांमधील तिसरी कसोटी 26 जुलैपासून खेळवली जाणार आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 143 धावांवरच मर्यादित राहिला. अशा प्रकारे यजमान इंग्लंडने 241 धावांनी मोठा विजय मिळवला.
इंग्लंड पहिला डाव….
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 416 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. यादरम्यान ऑली पोपने इंग्लंडकडून सर्वाधिक 121 धावांची शतकी खेळी केली. याव्यतिरिक्त बेन डकेटने 71 धावा तर कर्णधार बेन स्टोक्सनेही 69 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने सर्वाधिक 3 तर जेडेन सील्स, केविन सिंक्लेअर आणि केव्हम हॉजने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
वेस्ट इंडिज पहिला डाव…
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 457 धावांवर आटोपला. यादरम्यान वेस्टइंडिजकडून केवम हॉजने 171 चेंडूंचा सामना करत 19 चौकारांसह सर्वाधिक 120 धावा केल्या. अलिक अथानाजे आणि जोशुआ डी सिल्वा यांनी प्रत्येकी 82 धावा केल्या, त्यामुळे विंडीज संघाने पहिल्या डावानंतर 41 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या डावात 4 बळी घेतले, तर गस ऍटकिन्सन आणि एब बशीर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
A grueling 2nd Test comes to an end at Trent Bridge with England taking the win.🌴🏴#ENGvWI | #MenInMaroon | #Apex pic.twitter.com/xSV6NCWoTK
— Windies Cricket (@windiescricket) July 21, 2024
इंग्लंड दुसरा डाव….
पण इंग्लंडने दुसऱ्या डावात शानदार पलटवार केला. इंग्लंडसाठी हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी दुसऱ्या डावात शतकी खेळी केल्या. जो रूटने 178 चेंडूत 122 धावा केल्या. तर हॅरी ब्रूकने 132 चेंडूत 109 धावांचे योगदान दिले. त्यामुळे यजमान संघाने 425 धावसंख्येपर्यत मजल मारत वेस्टइंडिजसमोर विजयासाठी 385 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
वेस्टइंडिज दुसरा डाव….
मात्र, दुसऱ्या डावात विंडीजच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. सलामीवीरानी चांगली सुरुवात केली. क्रेग ब्रॅथवेट आणि मायकेल लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर सातत्याने विकेट पडण्याची मालिका सुरू झाली. सलामीवीर क्रेग ब्रॅथवेटने 47 तर जेसन होल्डरने निश्चितपणे 37 धावा केल्या, पण वेस्ट इंडिजचे इतर फलंदाज इंग्लिश गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. वेस्ट इंडिजचे 7 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत आणि इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर वेस्ट इंडिजचा दुसरा डाव अवघ्या 143 धावांत आटोपला. इंग्लंडकडून गोलंदाजीत दुसऱ्या डावात शोएब बशीरने पाच तर ख्रिस वोक्स आणि गस ऍटकिन्सनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी मार्क वुडला एक विकेट मिळाली.