रश्मी ठाकरेंसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर लिहीणे हा महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनीचा अपमान – महेश तपासे

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंसंदर्भात भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख जितेन गजारिया यांनी ट्वीटरवर आक्षेपार्ह मजकूर लिहीला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी टीका केली आहे.
महेश तपासे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान करण्याचे बाळकडू आपल्याला लहानपणापासून मिळत असते. राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान सर्वांनी केला आहे. परंतु भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरेंसंदर्भात आक्षेपार्ह मजकूर लिहीणे हा महाराष्ट्राचा तसेच इथल्या प्रत्येक भगिनीचा अपमान असल्याचे महेश तपासे म्हणाले.
भारतीय जनता पार्टी नैतिकतेचा ढोल बडवत असते. पण त्यांच्या आयटी सेल प्रमुखाला जर ही साधी गोष्ट समजत नसेल तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस त्यांना योग्यप्रकारे महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे त्यांना समजावेल, असा इशारा त्यांनी केला आहे.





