WPL 2025 Final MI vs DC : मुंबईने रोमांचक सामन्यात बाजी मारत दुसऱ्यांदा पटकावलं जेतेपद, दिल्लीचा सलग तिसऱ्या फायनलमध्ये पराभव

WPL 2025 Final MI vs DC : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या डब्ल्यूपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी धुव्वा उडवत दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ७ बाद १४९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचा संघ २० षटकांत ९ बाद १४१ धावाच करु शकला. त्यामुळे त्यांचे सलग तिसऱ्यांदा फायलमध्ये पोहोचून ट्रॉफी जिकण्याचे स्वप्न स्वप्नचं राहिले. या विजयात मुंबईसाठी नॅट सिव्हर ब्रंटने अष्टपैलू कामगिरी करत महत्त्वाची भूमिका निभावली.
मुंबईने दिले होते १५० धावांचे लक्ष्य –
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना, हरमनप्रीत कौरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ गडी गमावून १४९ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये हरमनप्रीतने ४४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ६६ धावांची खेळी साकारली. त्याच वेळी, नॅट सिव्हर ब्रंटने ३० धावांचे योगदान दिले. या खेळीदरम्यान, नॅट डब्ल्यूपीएल इतिहासात १००० धावा पूर्ण करणारी जगातील पहिली फलंदाज ठरली.
दिल्लीच्या फलंदाजांनी केली निराशा –
🏆 Mumbai Indians – #𝗧𝗔𝗧𝗔𝗪𝗣𝗟 𝟮𝟬𝟮𝟱 𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦 🏆
Scorecard ▶ https://t.co/2dFmlnwxVj #DCvMI | #Final | @mipaltan pic.twitter.com/JOV98PFNwq
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 15, 2025
दिल्ली कॅपिटल्सकडून गोलंदाजी करताना, मारिझान कापने शानदार गोलंदाजी केली. तिने मुंबई इंडियन्सच्या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय जेस जोनासेन आणि चरणी यांनी देखील प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर अॅनाबेल सदरलँडने एक विकेट्स घेतली. मुंबई इंडियन्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा अवघ्या १७ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतल्या. यानंतरही सतत विकेट्स पडण्याचा क्रम सुरूच राहिला. दरम्यान जेमिमाने तग धरण्याचा प्रयत्न केला पण ३० धावा करून ती पण बाद झाली. त्यामुळे दिल्लीचा अर्धा संघ १०.४ षटकांत ६६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
मारिझान कापची झुंज ठरली अपयशी –
१३ व्या षटकात सारा ब्राइस धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्याने दिल्लीला सहावा धक्का बसला. यानंतर, मारिझान कापने स्फोटक फलंदाजी करून विजयाच्या आशा उंचावल्या होत्या, पण नॅट सिव्हर-ब्रंटने १८ व्या षटकात सलग दोन विकेट्स घेत मुंबईचा विजय निश्चित केला. कापने २६ चेंडूत ४० धावांची खेळी केली. शिखा पांडे शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतली. २० षटकांत दिल्ली संघाला ९ विकेट्स गमावल्यानंतर फक्त १४१ धावा करता आल्या. मुंबईकडून नॅट सिव्हर ब्रंटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.





