22 गावांतील पाणीप्रश्‍नांची जखम भळभळती

इंदापूर तालुक्‍यातील आजी- माजी कारभारी निद्रिस्त

निमसाखर- इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न राजकारण्यासाठी डोकेदुखी ठरले आहे. पाणीप्रश्नासाठी अनेक राजकारणी मंत्री आले आणि गेले. मात्र, गेल्या 50 वर्षांपासून इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांच्या पाण्याचा प्रश्नांचे घोंगडे भिजत आजपर्यंत पडले आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पाणीप्रश्नावर टिकेची झोड उठवली. मात्र, खडकवासला कालव्यामध्ये उपसा सिंचन योजना पुढे आणून टिकेची धार कमी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे उजनीतून उपसा सिंचन योजना यशस्वी झाली तर पुढील मामांचे पारडे जड होते की काय, अशीच चर्चा कुठे होते. तोपर्यंत पाटील हे भाजपमध्ये जाणार या चर्चेभोवती 22 गावांचा पाणीप्रश्‍न फिरत आहे.

इंदापूर तालुक्‍यातील 22 गावांच्या पाण्याच्या प्रश्नांचे घोंगडे भिजत पडले असून एकही आमदार किंवा मंत्र्याला ते ठामपणे सोडवता आला नाही, ही शोकांतिकाआहे. दिशाभूल करणाऱ्यांनी आश्वासनाशिवाय वर्षानुवर्षे पदरी फक्‍त पाणी प्रश्नाबाबत इंदापूर तालुक्‍यातील जनतेची फसवणूक करून मते मात्र यांनी मिळवली. बावीस गावांतील लोकसंख्या 76 हजार 792 पर्यंत आहे. या गावातील मोठी लोकसंख्या व क्षेत्र असताना आजही ही गावे तहानलेलीच आहेच. नीरा डाव्या कालव्यातून 4 टीएमसी पाणी तर खडकवासला धरणाच्या सणसर कटद्वारे 3.9 टीएमसी पाणी असे 7.9 टीएमसी पाणी देऊन निमसाखर, घोरपडवाडी, निमगांव केतकी, सराफवाडी, पिटकेश्वर, रेडा, रेडणी, काटी, लाखेवाडी, बोराटवाडी, चाकाटी, शेळगांव, खोरोची, दगडवाडी, निरवांगी आदी 22 गावे आठमाही बागायती करण्याचा शासनाचा अध्यादेश आहे.

या गावांना नीरा डाव्या कालव्याच्या फाटा क्र. 46 ते 59 द्वारे पाणी आवर्तन देऊन हा बारमाही भाग बागायती करण्याचे स्वप्न शरद पवार, (स्व) गोपीनाथ मुंडे यांनी इंदापुरात येऊन घोषणाबाजी करीत शेतकऱ्यांना बागूबुवा दाखविला होता. त्यावेळी शरद पवार यांनी दि. 9 ऑगस्ट 1994 रोजी निमगाव केतकीच्या सभेत सणसर कटचे काम पूर्ण झाले. उसाची लागवड करावी, असे आवाहन करीत 12 पाण्याच्या पाळ्या मिळतील, असे घोषीत केले.

आजही पाणी दूरच गोष्ट झाली आहे. उन्हाळी हंगामातील दोन आवर्तनावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागत आहे. पूर्वी उन्हाळी हंगामात शेतीला पाणी मिळत नव्हते. त्यावेळी रब्बीतील ज्वारीच्या दाणा भरती प्रक्रियेवेळी पाण्यासाठी लढा उभारावा लागत होता. त्यावेळी पाणी प्रश्‍नासाठी सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत रणवरे, इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कै. विश्वासराव रणसिंग व कै. भीमराव सूळ यांनी योगदान दिले. तसेच देत आहेत.

  • आता विधानसभेला जखमेवर मीठ चोळणार
    शेततकऱ्यांच्या तीन पिढ्यांनी पाण्यासाठी रास्ता रोको, उपोषण करून आंदोलनाची व्याप्ती वाढविली. 22 गावांतून पाणी प्रश्नावर जनरेटा उभारूनही अद्याप हा प्रश्‍न सुटला नाही. त्यामुळे हा पाणीप्रश्‍न वरकरणी शांत असला तरी आतून धुमसत आहे. खासदार सुप्रिया सुळे या बारामती लोकसभेच्या खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करीत आहेत. माजीमंत्री पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करताना सलग वीस वर्षे मंत्रीपद उपभोगलेले आहे. राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे साडेचार वर्षांपासून इंदापूरचे कारभारी विधानसभेत इंदापूरचे नेतृत्व करीत आहेत. अनेक राजकिय मंडळीनी स्वार्थापोटी पाणी प्रश्‍नांबाबत नुसतीच कोरडी आश्‍वासने देऊन राजकारण्यांनी मताच्या स्वार्थासाठी आजपर्यत हा पाणी प्रश्न झुलवत ठेवला आहे. आता विधानसभेच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर आश्‍वासनाची मलमपट्टी केली जाणार आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढविल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार आहे.
  • उजनीतून पाण्यासाठी खटाटोप
    इंदापूर तालुक्‍यातील शेटफळगढेलगतच्या खडकवासला फाट्यामध्ये उजनी धरणातून पावसाळ्यात तलाव भरण्यासाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी मिळावे, यासाठी भरणेंकढून प्रयत्न होत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन नुकतेच दिले. यात मात्र पावसाळ्यातच तालुक्‍यातील तळी भरण्यासाठी याचा वापर होणार आहे. ही बाब चांगली असली तरी या संकल्पनेत इतर वेळेसही शेतीला पाणी मिळण्यासाठी प्रयत्न होणे जरुरीचे आहे. या प्रकल्पाचे सर्वेक्षण होणार आहे. भरणेंच्या माध्यमातून पालकमंत्री पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×