चिंताजनक: सायबर हल्ल्यांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर

मुंबई – भारतात स्मार्टफोन वापरणार्यांची संख्या जास्त आहे. डिजिटल अर्थव्यवस्था वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतावर होत असलेले सायबर हल्ले जगातील इतर देशापेक्षा जास्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. बँकांवर झालेले मालवेअर अटॅक गेल्या वर्षी 29 टक्क्यांनी वाढले. तर मोबाईल्स स्पायवेअर अटॅक तब्बल 111 टक्क्यांनी वाढले आहेत.
मोबाईल वापरणार्यांना फसवून त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती जमवली जाते. नंतर रक्कम पळविण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा बँकावरही असे हल्ले झाले आहेत. या अगोदर सायबर हल्ल्यात भारत तिसर्या क्रमांकावर होता मात्र. आता तो अमेरिका आणि कॅनडाला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर आला आहे.
जगभरात झालेल्या 20 अब्ज सायबर हल्ल्याचे विश्लेषण करून यासंदर्भात स्कॅलरथ्रेट लॅबने हा अहवाल तयार केला आहे. मोबाईल, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इतर इंटरनेट आधारित उपकरणावर झालेल्या हल्ल्याचा अभ्यास करण्यात आला आहे. जून 2023 ते मे 2024 या कालावधीत झालेल्या सायबर हल्ल्याचा अभ्यास करण्यात आला आहे.
या वर्षात एकूण झालेल्या सायबर हल्ल्यापैकी 28% सायबर हल्ले भारतावर, 27.3% अमेरिकेवर, 15.9% कॅनडावर झाले. भारतातील बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि सरकारने सायबर हल्ले होऊ नये त्यासाठीची यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज वाढली आहे. विशेषत: मोबाईल वापरणार्या नागरिकांनी आणि बँकांनी अधिक सावध राहून व्यवहार करण्याची गरज आहे.
सायबर हल्लेखराचे संशोधन आणि विकास बँकाच्या एक पाऊल पुढे असते, असे यातून आढळून येते. भारतातील अनेक खासगी बँकावर सायबर हल्ले झाले आहेत. भारतीय पोस्ट खात्यावरही हल्ले झाले असून ग्राहकाच्या माहितीचा दुरुपयोग करून हे हल्ले केले जातात.
प्लेस्टोअर असणार्या कंपन्यांनी हल्लेखोरांची अॅप आपल्या प्ले स्टोअर वरून काढून टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. सुदैवाची बाब म्हणजे भारतातून होणारे सायबर हल्ले आता कमी झाले आहेत. या अगोदर सायबर हल्ले होण्यात भारत सातव्या क्रमांकावर होता. तो आता पाचव्या क्रमांकावर आला आहे.





