Stock market: सायबर हल्ले रोखण्यासाठी शेअर बाजाराकडून उपाययोजना

मुंबई – भारत -पाक तणावानंतर भारतातील काही महत्त्वाच्या संस्थावर तुरळक सायबर हल्ले होत होते. आता भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरवर क्षेपणास्त्र हल्ले केले. यामुळे शेअर बाजारावर सायबर हल्ले होऊ नयेत, यासाठी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारांनी परिस्थितीपूर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार या दोन शेअर बाजारांनी आंतरराष्ट्रीय वापरर्त्यासाठी असलेल्या वेबसाईट या कालावधीत ब्लॉक केल्या होत्या. बुधवारी दिवसभर भारतीय शेअर बाजाराचे कामकाज सुरळीत चालले आणि शेअर बाजार निर्देशांकात वाढ नोंदली गेली.
या निर्णयाचे स्पष्टीकरण करताना मुंबई शेअर बाजाराच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुंबई शेअर बाजार ही महत्त्वाची बाजार पायाभूत सुविधा आहे. यामुळे देशांतर्गत आणि परकीय सायबर हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी शेअर बाजारांची यंत्रणा कायम सावध असते. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सायबर हल्ले होण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परदेशी कर्त्यासाठी असलेली वेबसाईट बंद करण्यात आली होती.
अजूनही शेअर बाजाराचे जागतिक आणि देशातील घडामोडीकडे बारीक लक्ष आहे. परिस्थिती पाहून विविध देशांसंदर्भात निर्णय घेतले जातील. दरम्यानच्या काळात बदलणार्या घडामोडीकडे शेअर बाजाराचे लक्ष असेल.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रवक्त्याने मात्र यासंदर्भात कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. पाकिस्तानातील काही हॅकर्स भारतीय संस्थावर आणि शेअर बाजारावर सायबर हल्ले करण्याची शक्यता गृहीत धरून आगामी काळातही या उपाययोजना कायम ठेवण्यात येणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान भारताच्या क्षेपणास्त्रा हलनंतर आतापर्यंत तरी पाकिस्तानने फारशी आक्रमक प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तरीही परिस्थितीकडे लक्ष आहे.




