चिंताजनक..! पुन्हा रुग्णसंख्या शंभरच्या वर

पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरामधील करोनाबाधित रुग्णांची संख्या सोमवारी शंभरहून कमी झाली होती. आज पुन्हा रुग्णसंख्येने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी (दि. 17) शहरात 151 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 120 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज शहरात 151 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 67 हजार 404 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील 2 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात आणखी 2 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4381 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 120 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 62 हजार 49 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3466 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 653 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 318 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन रुग्णांची संख्या 974 इतकी आहे.





