वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात

वरळी : पुण्यात कल्याणीनगर परिसरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असताना मुंबईतील वरळीमध्ये अशीच हिट अँड रनची घटना घडली आहे. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वरळीतील एनी बेझंट मार्गावर ॲट्रीया मॉल जवळ ही घटना घडली.
काय घडले नेमके?
मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्य स्कुटरवरुन जात असताना बीएमडब्यू कारने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोघंही कारच्या बोनटवर पडले. कार चालकाने कार न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेली. प्रदीप नाखवा हे बाजूला फेकले गेले तर कावेरी नाखवा ह्या बोनटवरून खाली पडल्या आणि त्यांच्या साडीचा पदर कारमध्ये अडकल्याने त्या फार पुढे फरफटत गेल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करत सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर कार आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेतलं. त्याचबरोबर ही कार शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांची असल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनी त्यालादेखील ताब्यात घेतले आहे.
धक्कादायक म्हणजे वरळी हिट ॲड रनची घटना घडली तेव्हा शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा हे कारमध्ये नव्हते तर त्यावेळी त्यांचा मुलगा व ड्रायव्हर गाडीत होता. आरोपी मुलगा सध्या फरार असून पोलिसांना आरोपी मुलाचाही शोध लागला असून चालक मुलगा व ड्रायव्हर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.





