Oil Crisis: होर्मुझची सामुद्रधुनी बंद, कच्च्या तेलाचे भडकलेले दर, जगभरात एकाचवेळी धगधगणारे अनेक संघर्ष. या सगळ्या घडामोडी पाहता जगाला दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या १९३९ च्या परिस्थितीची आठवण करून देत आहेत. इतिहासाचे आणि भू-राजकारणाचे अभ्यासक या दोन कालखंडांमधील धक्कादायक समानतांकडे लक्ष वेधत आहेत. भारतासाठी हे संकट केवळ जागतिक नाही, ते थेट देशाच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि अर्थव्यवस्थेवर आघात करणारे आहे. १९३९ पूर्वीचे जग आणि आजचे जग — भयावह साम्य दुसरे महायुद्ध एकाएकी सुरू झाले नव्हते. सप्टेंबर १९३९ पूर्वीच अनेक प्रादेशिक संघर्ष धुमसत होते. चीन आणि जापान यांच्यातील युद्धात दहा लाखांहून अधिक बळी गेले होते. जर्मनीने ऑस्ट्रिया आणि चेकोस्लोव्हाकियावर कब्जा केला होता. इटलीने इथिओपिया, इरिट्रिया, सोमालिया आणि लिबियावर आक्रमण केले होते. सोव्हिएत संघाने एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया आणि फिनलंडचा मोठा भाग ताब्यात घेतला होता. स्पेनचे गृहयुद्ध (१९३६-३९) संपले होते आणि जर्मनीचा मित्र जनरल फ्रँको विजयी झाला होता. आज जगाचे चित्र वेगळे नाही. युक्रेन युद्धाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेले गाझावरील आक्रमण अद्यापही सुरू आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात संक्षिप्त संघर्ष झाला. पाकिस्तान आता अफगाणिस्तानशी लढत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर जहाजे बुडवली आणि तेथील राष्ट्राध्यक्षांना अटक केली. इराणवरील हल्ले आणि त्याच्या अमेरिकेच्या मित्र देशांवरील पलटवारांनी आखाती क्षेत्र युद्धभूमीत रूपांतरित झाले आहे. ऊर्जा — तेव्हाही आणि आताही केंद्रस्थानी दुसऱ्या महायुद्धातही ऊर्जेचा प्रश्न रणनीतीच्या केंद्रस्थानी होता. जपानने १९४१ मध्ये अमेरिकेवर हल्ला केला कारण अमेरिकेने तेल विक्रीवर बंदी घातली होती. जर्मनीने १९४१ मध्ये सोव्हिएत संघावर आक्रमण केले कारण त्याला सोव्हिएत तेलक्षेत्रे ताब्यात घ्यायची होती. ब्रिटन आणि सोव्हिएत संघाने संयुक्तपणे इराणवर आक्रमण केले जेणेकरून जर्मनीला इराणच्या तेलापर्यंत पोहोचता येऊ नये. आज होर्मुझची सामुद्रधुनी जहाजांसाठी बंद आहे. जगाच्या एकूण तेल व गॅस पुरवठ्यातील २० टक्के हिस्सा यामुळे अडला आहे. कतरने अनपेक्षित परिस्थितीचे कारण देत LNG उत्पादन बंद केले आहे. टँकर भाड्याचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत आणि विमा कंपन्यांनी शिपिंग प्रीमियम वाढवले आहेत. तेलाच्या किंमती कुठे पोहोचल्या? ब्रेंट क्रूड वायदा २८ फेब्रुवारी रोजी ६० डॉलर प्रति बॅरल होता, तो ६ मार्चपर्यंत ८५ डॉलरवर पोहोचला. LNG ची किंमत याच कालावधीत ११ डॉलर प्रति MM BTU वरून २४ डॉलरवर गेली. गॅस टँकर चार्टर दरांमध्ये तब्बल ६०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. होर्मुझ सामुद्रधुनी केवळ एक आठवडा बंद राहिल्याने आणि इराणमधील उत्पादन ठप्प झाल्याने वार्षिक तेल उत्पादन पातळी २ टक्क्यांनी घसरली आहे. सौदी अरेबियाकडे असलेली अतिरिक्त उत्पादनक्षमताही वापरता येत नाही कारण ती निर्यात होर्मुझमार्गेच होते. हेही वाचा: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! किरकोळ थकबाकीसाठी बिल्डर ताबा हिरावून घेऊ शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल संघर्ष लांबला तर काय होईल? युद्धविराम न झाल्यास दर आठवड्याला होर्मुझ बंद राहिल्याने जागतिक पुरवठ्यात आणखी ०.५ टक्के घट होत राहील. विश्लेषकांच्या मते हा संघर्ष पाच-सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालला तर साठे संपत जातील आणि किंमती झपाट्याने वाढतील. काही अंदाजांनुसार सहा आठवड्यांनंतर गॅसची किंमत ४० डॉलर प्रति MM BTU पर्यंत आणि ब्रेंट क्रूड तब्बल २२० डॉलर प्रति बॅरलपेक्षाही अधिक जाऊ शकते. भारतासाठी धोक्याची घंटा – भारताच्या गॅस व कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा होर्मुझमार्गे येतो. अमेरिकेने भारताला पुढील ३० दिवसांसाठी रशियन कच्च्या तेलाची आयात करण्यास परवानगी दिली आहे, मात्र ही तात्पुरती व्यवस्था आहे. तेल व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ९ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत दिलेल्या निवेदनानुसार भारताचा आपत्कालीन पेट्रोलियम साठा ७४ दिवस पुरेल. मात्र इतर अंदाजांनुसार हा साठा केवळ २५ ते ५० दिवसच पुरेल. भारतातील इंधनाच्या किंमती ब्रेंट क्रूडशी निगडित आहेत. पेट्रोल व डिझेलच्या किरकोळ किंमतींचा आढावा तेल विपणन कंपन्या दररोज घेऊ शकतात. एप्रिलमध्ये गॅस किंमत पुनरावलोकनाच्या वेळी होर्मुझ अद्याप बंद राहिल्यास किंमती पुन्हा ठरवणे ही मोठी समस्या ठरेल. अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम अटळ – किरकोळ किंमतींमध्ये अचानक वाढ झाल्यास अर्थव्यवस्था मंदीकडे जाण्याचा धोका आहे. किंमती नियंत्रणात ठेवायच्या तर सरकारवर प्रचंड अनुदानाचा बोजा पडेल. खताच्या अनुदानातही वाढ होईल. भारताने १९७३, १९७९ आणि १९९१ च्या प्रत्येक तेल संकटात मंदीला सामोरे जावे लागले होते. या वेळी परिस्थिती वेगळी असण्याचे कोणतेही ठोस कारण दिसत नाही. १ मार्चपूर्वी केलेले सर्व अर्थसंकल्पीय अंदाज आणि व्यापार समतोलाचे अंदाज आता नव्याने तपासावे लागणार आहेत. हे सगळे पाहता दुसऱ्या महायुद्धाशी साम्य अधिकच गडद होत चालले आहे.