World Test Championship final : विल्यमसन, बोल्ट व वॅगनरचा धोका

वेलिंग्टन – कर्णधार केन विल्यमसन, वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट व अष्टपैलू नील वॅगनर या तीन खेळाडूंपासून विराट कोहलीच्या भारतीय संघाला धोका आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत सहभागी होत असून, त्यापूर्वी भारतीय संघाला या तीनही खेळाडूंना उत्तर शोधावे लागणार आहे.
अंतिम सामना 18 ते 22 जूनदरम्यान साऊदम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या याच तीन खेळाडूंपासून भारताला धोका आहे. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनकडे मोठी जबाबदारी असेलच पण कर्णधारपदाची देखील जबाबदारी त्याच्याकडे असणार आहे.
विल्यमसनची गणना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांत केली जाते. त्याने यंदाच्या मोसमात खेळलेल्या 9 सामन्यांत 58.35 च्या सरासरीने 817 धावा केल्या आहेत. अंतिम सामन्यात त्याला खेळपट्टीवर जास्त वेळ स्थिरावू न देण्याची कामगिरी भारतीय संघाला करावी लागेल.
न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व ट्रेन्ट बोल्ट करणार आहे. बोल्टने भारतीय फलंदाजांना सातत्याने त्रस्त केले आहे. त्यांचे स्विंग चेंडू भारतीय फलंदाजांना दडपणाखाली ठेवतील. साऊदम्पटनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी आहे. अशावेळी बोल्टला जर खेळपट्टीने साथ दिली तर बोल्ट भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.
नील वॅगनर हा न्यूझीलंडचा आणखी एक सरस गोलंदाज आहे. तो त्याच्या शॉर्ट पीच बॉलसाठी ओळखला जातो. जागतिक क्रिकेटमधल्या दिग्गजांना त्याने आपल्या शॉर्ट पीच गोलंदाजीने त्रस्त केले आहे. त्याने 51 कसोटी सामन्यांत न्यूझीलंडसाठी 219 बळी घेतले आहेत. अंतिम सामन्यात वॅगनरच्या शॉर्ट बॉलपासून भारतीय फलंदाजांना जबाबदारीने खेळ करावा
लागणार आहे.





