World Para Championships 2024 : पॅरा ॲथलीट दीप्तीची विश्वविक्रमासह सुवर्ण कामगिरी….

World Para Athletics C’ships 2024 (Deepthi Jeevanji,India) : भारतीय पॅरा ॲथलीट दीप्ती जीवनजीने जागतिक पॅरा ॲथलेटिक्समध्ये विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या दीप्तीने टी-20 प्रकारात 400 मीटर शर्यतीत 55.07 सेकंदाची वेळ नोंदवत नवा विक्रम केला.
तिने गेल्या वर्षी याच चॅम्पियनशिपमध्ये अमेरिकेच्या ब्रायना क्लार्कने नोंदवलेला 55.12 सेकंदाचा विक्रम मागे टाकला. तुर्कीच्या आयसेल ओंडरने 55.19 सेकंदांसह रौप्य आणि इक्वेडोरच्या लिजनशेला अँगुलोने 56.68 सेकंदांसह कांस्यपदक जिंकले.
दीप्तीने रविवारी 56.18 सेकंद अशी सर्वोत्तम आशियाई वेळ नोंदवत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती, ज्याचे तिने अंतिम सामन्यात विश्वविक्रमात रूपांतर केले.
थाळीफेकमध्ये योगेशला रौप्य…
भारतीय डिस्कस थ्रोअर योगेश कथुनियाने 41.80 मीटर अंतरासह डिस्कस थ्रोच्या (थाळीफेक) F-56 प्रकारात रौप्य पदक जिंकले. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या योगेशचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील हे तिसरे पदक आहे. गेल्या वर्षी त्याने पॅरिसमध्ये रौप्यपदक जिंकले आणि 2019 मध्ये त्याने दुबईमध्ये कांस्यपदक जिंकले.
निषादला उंच उडीत रौप्यपदक…
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या उंच उडीपटू निषाद कुमारने रविवारी येथे टी-47 प्रकारात उंच उडीमध्ये रौप्य पदक जिंकले. निषादचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील तिसरे पदक आहे. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये रौप्य आणि दुबईमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तर दुसरीकडे प्रीती पॉलने T-35 प्रकारातील 200 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले.





