World Heritage Pageant : बँकॉकमध्ये रंगणार आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा; भारताचे तीन स्पर्धक सज्ज
World Heritage Pageant : गायत्री भांबारे, यश पोतदार आणि डॉ. सपना साहू करणार भारताचे प्रतिनिधित्व

World Heritage Pageant : थायलंडची राजधानी बँकॉक येथे २० नोव्हेंबर २०२६ पासून ‘वर्ल्ड हेरिटेज पेजंट’ ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पुण्यातील मृणाल एन्टरटेन्मेंटचे तीन स्पर्धक भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. नाशिकची गायत्री भांबारे, ठाण्याचा यश पोतदार आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील डॉ. सपना साहू यांचा त्यात समावेश आहे.
स्पर्धेत गायत्री ‘मिस हेरिटेज इंडिया’, यश ‘मिस्टर हेरिटेज इंडिया’, तर डॉ. सपना ‘हेरिटेज गोल्ड इंडिया’ या किताबांसह सहभागी होणार आहेत. भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
हेरिटेज पेजंट इंडियाचे राष्ट्रीय संचालक मृणाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही स्पर्धकांना गेल्या महिनाभरापासून प्रशिक्षण दिले जात आहे. व्यक्तिमत्त्व विकास, भारतीय संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि परंपरा प्रभावीपणे सादर करण्यावर या प्रशिक्षणात भर दिला जात आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडण्याचा या सहभागाचा उद्देश असल्याचे संस्थेने सांगितले. तिन्ही स्पर्धकांना मृणाल एन्टरटेन्मेंटतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.





