World Cup 2023 : सेमीफायनलमध्ये ‘या’ चार टीम्स आपापसात भिडतील.. क्रिस गेलने केलं मोठं भाकीत

नवी दिल्ली – वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी उपांत्य फेरीतील चार संघांची निवड केली आहे. युनिव्हर्स बॉस या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेल आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी क्रिकेट जगतात ओळखला जातो. गेलने यंदाच्या विश्वचषकात फायनलपर्यंत धडक मारणाऱ्या संघांबाबत भाकीत केलं आहे.
हे भाकीत करत ख्रिस गेलने पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला दणका दिला आहे. ४३ वर्षीय गेलने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रतिद्वंद्वामुळे संपूर्ण जग या दोन संघांमधील सामने पाहते, त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आयसीसीकडे अधिक पैशांची मागणी केली पाहिजे.
ख्रिस गेल म्हणाला, “जेव्हाही भारत आणि पाकिस्तान खेळतात, विशेषत: विश्वचषकात, तेव्हा बोर्डाला याचा खूप मोठा फायदा होतो. या मॅचेस टीव्हीवर दाखवण्यासाठी खूप पैसे देखील मिळतात. म्हणून असे सामने खेळण्यासाठी खेळाडूंनी अधिक पैशांची मागणी करायला हवी असे गेलं म्हणतो. पाकिस्तान, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीत धडक मारतील असा अंदाज गेलने यावेळी व्यक्त केला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकपमधील हाय होल्टेज सामना होणार आहे. या सामन्याला विक्रमी १ लाख प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान सामना जाहीर झाल्यापासून अहमदाबादमधील हॉटेल्सच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अहमदाबादमध्ये हॉटेल्सचे आगाऊ बुकिंग सुरू झाले असून येथील एका दिवसाचे भाडे 50 हजारांच्या जवळपास पोहोचल्याचे कळते.





