World Cup 2023 : शार्दुल ठाकूरच्या निवडीवरून के.श्रीकांत यांची निवड समितीवर टीका, म्हणाले “खेळवण्याचा प्रयोग केला तर …”

नवी दिल्ली :- एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी झालेल्या भारतीय संघ निवडीवरून आता आजी माजी क्रिकेटपटू आपली मते मांडत आहेत. त्यातच निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी संघातल शार्दुल ठाकूरच्या निवडीवरून निवड समितीवर टीका केली आहे. शार्दुलला स्वतःला अष्टपैलु म्हणून सिद्ध करण्यासाठी अद्याप बराच वेळ आहे, असेही ते म्हणाले.
केवळ गोंलदाजीद्वारेच नव्हे तर फलंदाजीद्वारेही संघासाठी मोलाची कामगिरी करणारे अष्टपैलु संघात असणे हीच आज गरज आहे. मात्र, शार्दुलचे अष्टपैलुत्व अद्याप सिद्ध झालेले नाही. मुळातच स्पर्धा भारतात होत आहे व या स्थितीत एकाच संघात चार वेगवान गोलंदाज खेळवणे शक्यच होणार नाही.
मग रवींद्र जडेजा व अक्सर पटेल यांची अंतिम संघातील निवड निश्चित मानली जात असताना शार्दुलला कशी संधी दिली गेली. उलट संघात कुलदीप यादवसह आणखी एक परीपूर्ण फिरकी गोलंदाज निवडणे गरजेचे होते, असेही श्रीकांत म्हणाले.
हार्दिक पंड्या दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर होता तेव्हा शार्दुलनेच त्याची उणिव भरून काढली होती हे देखील मान्य परंतू पंड्याला शार्दुल हा कायमस्वरुपी पर्याय होऊ शकत नाही. त्यातच शार्दुल आठव्या क्रमांकावर खेळण्याचीच शक्यता जास्त आहे. मग संघाची फलंदाजी खोलवर होइल असे जे कर्णधार रोहित म्हणत आहे ते एका दृष्टीने बरोबर वाटत असले तरीही त्याची गरज नाही. संघात आठ फलंदाज खेळवण्याचा प्रयोग केला तर उलट नुकसानच जास्त होणार आहे. भारतीय संघाला पहिल्या पाच फलंदाजांवर विश्वास नाही, असाच त्याचा अर्थ निघेल, असेही श्रीकांत यांनी म्हटले आहे.
संघाला आठव्या क्रमांकावर फलंदाजी करु शकेल अशी क्षमता असलेल्या गोलंदाजाची गरज नाही. त्या जागी परिपूर्ण फिरकी किंवा वेगवान गोलंदाजाची निवड करता आली असती, असेही श्रीकांत म्हणाले.





