विराट कोहली म्हणजे भारतीय संघाचे रनमशीन मानले जाते. आक्रमक फलंदाजी, जशी फलंदाजी तसाच आक्रमक स्वभाव, समोरच्या गोलंदाजांवर राज्य करत त्याने अनेक शतके फटकावली. मात्र, रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जी शतकी खेळी केली ती चाहत्यांसाठीही आश्चर्याचीच बाब ठरली. कारण ते एका जागतिक स्तरावरील आक्रमक फलंदाजाचे चक्क संयमी शतक होते.
2019 सालानंतर कोहलीने कसोटी शतक फटकावले. त्यातही त्याने तब्बल 200 पेक्षा जास्त चेंडू खेळले. हेच तर त्याला इतक्या काळात जमत नव्हते. परंतू कोहलीही सचिन तेंडुलकरसारखा आपल्या चुकांवर मात करत यश मिळवणारा खेळाडू आहे. मागे एकदा सचिनने ऑस्ट्रेलियात एकही कव्हर ड्राइव्ह न मारता शतक फटकावले होते. कारण या मालिकेत तो सतत हाच फटका मारताना बाद होत होता. जसे त्यावेळी सचिनने उत्तर शोधले तीच प्रश्नपत्रीका कोहलीने रविवारी सोडवली व शंभर टक्के गुणही मिळवले.
कोहलीच्या या शतकी खेळीत त्याने समोरच्या गोलंदाजाला एकदाही मीच राजा आहे हे दाखवले नाही. कोणत्याच गोलंदाजाला त्याने एकही संधी दिली नाही. असे चान्सलेस शतक खूप कमी वेळा पाहायला मिळते. त्याने कट, पूल, ग्लान्स, स्टीअर, स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह हे सगळे फटके मारले मात्र, केवळ एक-दोन वेळाच त्याने स्क्वेअर ड्राईव्ह व स्वीपचे फटके खेळले कारण हेच फटके खेळताना तो गेली तीनपेक्षा जास्त वर्षे बाद होत आला आहे.
#INDvAUS 4th Test Day 4 Stumps : चौथ्या दिवसावर विराटचंच वर्चस्व; कसोटी अनिर्णित अवस्थेकडे…
विक्रमादीत्य सुनील गावसकर म्हणाले, तसाच कोहली हा डाव खेळला. यष्टीरक्षक जसा थोडा पुढे झुकुन उभा राहतो तसाच कोहलीनेही स्टान्स घेतला. टॉड मर्फी, नाथन लॉयन यांनी त्याला या कसोटी मालिकेत सातत्याने चकवले आहे मात्र, कोहलीने या शतकी खेळीत त्यांच्या सगळ्या योजना उधळून लावल्या. यालाच तर खेळाडूची महानता म्हणतात. आंतरराष्ट्रीय शतकांच्या पंच्याहत्तरीत पोहोचलेला कोहलीने सचिनसारखी आंतरराष्ट्रीय शतकांची शंभरीही पार करावी हीच अपेक्षा आहे.