जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धा; अमित व मनीषचा ऑलिम्पिक प्रवेश निश्‍चित

एकतेरिनबर्ग (रशिया): भारताच्या अमित पंघल (52 किलो) व मनीष कौशिक (63 किलो) यांनी जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेतील उपांत्य फेरीतील प्रवेशासह ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील प्रवेशही निश्‍चित केला आहे. हे दोन्ही खेळाडू शुक्रवारी उपांत्य फेरीच्या लढती खेळणार आहेत.

या दोन्ही खेळाडूंनी पदके निश्‍चित करीत भारतास ऐतिहासिक यश मिळवून दिले आहे. या स्पर्धेत आजपर्यंत कधीही भारताला एका वेळी दोन पदकांची कमाई झालेली नाही. भारताच्या एकाही खेळाडूला या स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आलेली नाही. भारताच्या विजेंदरसिंग (2009), विकास कृष्णन (2011), शिवा थापा (2015) व गौरव बिदुरी (2017) यांना या स्पर्धेत ब्रॉंझपदकाची कमाई झाली आहे. अमितपुढे आज कझाकिस्तानच्या सेकेन बिबोसिनोवच्या आव्हान आहे. मनीषची अग्रमानांकित अँडी गोमेझ क्रूझबरोबर लढत होणार आहे.

भारतीय संघाचे उच्च कामगिरी संचालक सॅंटियागो निएवा यांनी सांगितले की, या दोन्ही खेळाडूंनी ऑलिम्पिकमधील प्रवेशामुळे माझ्या अपेक्षा उंचावल्या आहेत. येथे त्यांनी अंतिम फेरी गाठली तर मला नवल वाटणार नाही. त्यांनी सराव शिबिरात खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्याकडे ऑलिम्पिकमध्येही पदक मिळविण्याची क्षमता आहे.

भारताचे मुख्य प्रशिक्षक सी.ए.कुटप्पा यांनी सांगितले की, दोन्ही खेळाडूंनी पदक निश्‍चित केल्याचा मला आनंद झाला आहे. मात्र, त्यांच्याकडून मला सुवर्णपदकांचीच अपेक्षा आहे. या दोन्ही खेळाडूंनी गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. जरी उपांत्य फेरीत त्यांच्यापुढे खडतर आव्हान असले तरी त्यास सामोरे जाण्यासाठी आवश्‍यक कौशल्य त्यांच्याकडे आहे.

शेवटपर्यंत झुंज देणार- अमित
बिबोसिनोवकडे दोन्ही हाताने जोरदार ठोसे मारण्याची क्षमता आहे व त्यानुसार मी रणनीती आखली आहे. कोणताही खेळाडू बलवान असला तरी त्याच्याकडूनही चुका होतात. त्याच्यातही काही उणीवा असतात. मी त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे असे अमितने सांगितले.

“होमवर्क’ केला आहे-मनीष
क्रूझ हा जरी अव्वल दर्जाचा खेळाडू असला तरी त्याच्या शैलीचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. तो महान खेळाडू असला तरी त्याच्याविरूद्ध मी शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने खेळणार आहे. आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव मानला जातो व मी हेच तंत्र वापरणार आहे. त्यादृष्टीने मी भरपूर सराव केला आहे असे मनीषने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.