गरीब देशांसाठी जागतिक बॅंकेचे 1.9 अब्ज डॉलर्सचे पॅकेज
भारताला मिळणार 1 अब्ज डॉलर्स

वॉशिंग्टन – जागतिक बॅंकेने करोनाशी झुंजणाऱ्या गरीब देशांसाठी 1.9 अब्ज डॉलर्सचे पहिले पॅकेज जाहीर केले असून त्यातील तब्बल 1 अब्ज डॉलर्सची मदत एकट्या भारताला मिळणार आहे. उर्वरित मदत 24 देशांना वाटून दिली जाणार आहे. त्यातील 200 दशलक्ष डॉलर्स पाकिस्तानला, 129 दशलक्ष डॉलर्स श्रीलंकेला आणि 100 दशलक्ष डॉलर्स अफगाणिस्तानला दिले जाणार आहेत. इथोपियासाठी 83 दशलक्ष डॉलर्स जाहीर करण्यात आले आहेत.
जागतिक बॅंकेचे अध्यक्ष डेव्हीड मालपास यांनी सांगितले की, पुढील पंधरा महिन्यांच्या काळात जागतिक बॅंकेला विविध देशांना एकूण 160 अब्ज डॉलर्सची मदत द्यावी लागणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील ही मदत करोनाशी झुंज देण्यासाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी आहे. जागतिक बाजारांमधून ही उपकरणे उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न जागतिक बॅंकेकडून केला जाणार आहे. या 25 देशांनंतर अन्य 40 देशांनाही लवकरच मदत पॅकेज जाहीर केले जाणार आहे. जागतिक बॅंकेकडून दिल्या गेलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी 14 महिन्यांचा अवधी वाढवून देण्याचाही जागतिक बॅंकेचा प्रस्ताव आहे; पण अजून त्यावर निर्णय व्हायचा आहे.





