महिला सक्षमीकरणासाठी कार्यशाळा काळाची गरज: प्राचार्य डॉ. अरुण घनवट

नेवासा : ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे, त्यांना हक्कांची जाणीव करून देणे आणि कायदे तसेच आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे यासाठी महिला सक्षमीकरण कार्यशाळा ही काळाची गरज असल्याचे मत श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण घनवट यांनी व्यक्त केले. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यशाळेत डॉ. सारिका आरेकर, ॲड. स्मिता लवांडे, प्रा. डॉ. लक्ष्मी कांगुणे, आयोजक प्रा. डॉ. पुष्पलता घोरपडे आणि प्रा. डॉ. कार्तिकी नांगरे उपस्थित होत्या. डॉ. आरेकर यांनी महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याच्या पद्धतींवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “महिलांनी सकस आहार घेऊन रक्तवाढीसाठी प्रयत्न करावेत. महिलांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण आणि आरोग्य राखण्यासाठी योग्य माहिती घेणे गरजेचे आहे.”
ॲड. स्मिता लवांडे यांनी ‘महिला कायदे आणि सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “स्वसंरक्षणासाठी महिलांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. कौटुंबिक हिंसाचार, पॉस्को यासारख्या कायद्यांची माहिती महिलांना असावी.” त्यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेचे प्रस्तावन डॉ. कार्तिकी नांगरे यांनी केले, तर सूत्रसंचालनही त्यांनीच सांभाळले. प्रा. स्वप्नाली दरंदले यांनी आभार मानले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. शारदा आदिक, ज्योती मोटे, प्रा. ऋतुजा जाधव, प्रा. संदीप शिरसाठ, प्रा. आरिफ पठाण, प्रा. विशाल परदेशी, संदीप भुजबळ, निखिल सावंत यांचे सहकार्य लाभले.





