Pimpari News : बालकलाकारांच्या सादरीकरणांनी रंगली कार्यशाळा; शिळिंब इन्स्टिट्यूटमध्ये १३० विद्यार्थ्यांचे सादरीकरण
मावळमधील शिळिंब इन्स्टिट्यूट येथे ‘अभिव्यक्ती’ ही बालकलाकारांसाठी कला प्रशिक्षण उन्हाळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचा सांगता समारंभ पवना येथील पवना विद्यामंदिर येथे उत्साहात पार पडला.

Pimpari News : मावळमधील शिळिंब इन्स्टिट्यूट येथे ‘अभिव्यक्ती’ ही बालकलाकारांसाठी कला प्रशिक्षण उन्हाळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचा सांगता समारंभ पवना येथील पवना विद्यामंदिर येथे उत्साहात पार पडला.
गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या या कला प्रशिक्षण उन्हाळी कार्यशाळेनंतर, तब्बल १३० बालकलाकारांनी रंगमंचावर आपली कला सादर करत उपस्थित पालक, स्थानिक नागरिक आणि रसिक प्रेक्षकची मने जिंकली. गेल्यावर्षी या कार्यक्रमात १५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर या वर्षी हा आकडा वाढून २०० ग्रामीण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
डॉ. मंजुषा सौरखिया यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित केली होती. तीन आठवड्यांच्या कालावधीत नामवंत मार्गदर्शकांनी भरतनाट्यमसाठी नृत्यांगना ललन देसाई, शास्त्रीय गायनासाठी गायक श्रेयस देशपांडे, नाट्यशास्त्रासाठी दिग्दर्शक संकेत बांगरे आणि वाद्यसंगीतासाठी वादक पवन झोडगे यांनी विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध धडे दिले.
कार्यक्रमादरम्यान ख्यातनाम संतूर वादक वीथिका टिक्कू यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. तसेच ग्रामीण भागातील प्रतिभेला मुख्य प्रवाहातील सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल शिळिंब इन्स्टिट्यूटच्या संचालिका सुश्री कॅरेन डिसूझा यांचे अभिनंदन केले.
शिळिंब इन्स्टिट्यूटचा ‘अभिव्यक्ती’ उपक्रम केवळ कला शिकवत नाही, तर भारताचे भावी सांस्कृतिक दूत घडवत असल्याचे चित्र यावेळी दिसले. या कार्यशाळेतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ४० कलाकारांची आता पुणे येथील एका मोठ्या कॉन्सर्टसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मावळच्या या छोट्या ताऱ्यांचा हा कलाप्रवास आता एका नव्या उंचीवर पोहोचणार आहे.





