Satara | जिल्हा बँकेतील नोकर भरतीबाबत सातार्यात शुक्रवारी कार्यशाळा

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीबाबत येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवार, दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात 2013 पासून बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू असून, या केंद्रात विविध बँकिंग स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग घेतले जात आहेत. जिल्हा बँकेत लिपिकांच्या 263 आणि शिपायांच्या 60 पदांची भरती स्पर्धा परीक्षेतून केली जाणार आहे.
यासाठी गणितीय अभियोग्यता, बुद्धिमापन चाचणी, बँकिंग, सहकार, अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयांवर आधारित ऑनलाइन परीक्षा होणार आहे.
या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी युवक-युवतींना या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेसाठी इच्छुक युवक-युवतींनी नावनोंदणी करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ. विठ्ठल सावंत व मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी केले आहे.





