कसरत
मीडियाबद्दल कुणी काही म्हणो, मीडियात काम करणं किती अवघड आहे, हे गेल्या काही दिवसांत आम्हाला यथेच्छ कळून चुकलंय! नेतेमंडळींना या मंडळींची दया कशी येत नाही, हाच प्रश्न आहे. किती काम करायचं हो या लोकांनी? केवढा तो सत्तानाट्याचा रंगमंच! गेल्या काही दिवसांतली स्थिती पाहता त्याला “फिरता रंगमंच’ म्हटल्यावाचून राहवत नाही. सतत सत्तानाट्याचं केंद्र बदलतं राहिलंय. कधी काय होईल, हे कळेनासं झालंय. नेमकं कुठे थांबावं? कुठून खात्रीलायक माहिती मिळेल? कुठे खरोखर महत्त्वाची खलबतं चाललीत? याचा अंदाज लावणं सोपं नाहीये हो! शिवाय, एखाद्या ठिकाणी बराच वेळ थांबूनसुद्धा माहिती मिळाली नाही, तर अंदाज करायचे!
आत काय घडलं असावं किंवा घडत असावं, याचं ऍनॅलिसिस करायचं. एखादी घटना किंवा घटनाक्रम समजून सांगण्यात फारसं अवघड काहीच नसतं; पण ज्यातलं कुणालाच काही कळेनासं झालंय, ते समजून सांगायचं म्हणजे कसरतच की! अंदाज बांधावेत तर काही तासांत परिस्थिती बदलते. आता आम्ही लिहीत असताना जी परिस्थिती आहे, ती हे लिखाण प्रसिद्ध होईपर्यंत टोकाची बदललेली असू शकते. पत्रकारांना हल्ली अनेक ठिकाणी दबा धरून बसावं लागतं. एखादा नेता बैठकीसाठी आला रे आला, की त्याला घेराव घालावा लागतो. मिळालेल्या कमीत कमी वेळात नेत्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारावे लागतात.
एखादी परिस्थिती “अभूतपूर्व’ असते म्हणजे नेमकं काय असतं, याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेतोय. यावर्षी पाऊस आणि राजकारण या दोहोंचा अंदाज कुणालाच वर्तवता आलेला नाही. पावसाचा अंदाज एखाद्या वेळी “कलर डॉपलर’ रडारद्वारे देता येईल आणि एखाद्या वेळी योगायोगानं का होईना, तो अचूक ठरूही शकेल; पण क्षणोक्षणी बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीत राजकारण्यांच्या मागे कुणी फिरायचं? म्हणूनच मीडिया रडारसारखा अनेक नेत्यांचा वेध घेत ऊर फुटेपर्यंत धावाधाव करतोय. हवामानापेक्षा अधिक लहरी झालेलं राजकारण आणि क्षणोक्षणी भूकंप, मास्टरस्ट्रोक, धक्कातंत्र वगैरे करायला सरसावलेले नेते मीडियालाही अंदाज लागू न देता अनेक गोष्टी करतायत, हे शनिवारपासून आपण अधिक तीव्रतेनं अनुभवतो आहोत. टीव्ही चॅनेलवरच्या अँकर मंडळींची तर अक्षरशः दया येऊ लागलीय. “आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी’ हे एक वाक्य बिचाऱ्यांनी दिवसातून किती वेळा ओरडून म्हणायचं? आता तर दहा-पंधरा मिनिटांनी अशी बातमी येतीय. करणार काय? चार प्रमुख पक्ष, त्यांचे वरिष्ठ नेते, त्या नेत्यांची निवासस्थानं, सगळ्या पक्षांचे आमदार, त्या आमदारांना एकत्रितपणे ठेवण्याची ठिकाणं, सर्व पक्षांनी स्वतंत्र आणि एकत्रित बैठकांसाठी निवडलेली ठिकाणं… हे सगळं कसं मॅनेज करत असतील हो मीडियावाले?
शनिवारी दुपारी वातावरण एकदम इतकं बिघडलं की मीडियावाल्यांना सगळी ठिकाणं सोडून थेट विमानतळाकडे धाव घ्यावी लागली. काही पक्षांचे आमदार विमानातून राज्याबाहेर जाण्याची भीती असल्यामुळं तिथे कार्यकर्त्यांनी “पहारा’ ठेवला होता म्हणे! आता मात्र हद्द झाली! खरं तर फक्त मीडियाला खबर दिली असती, तर कार्यकर्त्यांचीही गरज नव्हती. पत्रकारांचीच इतकी गर्दी झाली असती, की ती भेदून विमानापर्यंत पोचताच आलं नसतं. कुठवर चालणार ही कसरत, कुणास ठाऊक!
अबाऊट टर्न, हिमांशू





