कराड नगरपालिकेत कर्मचाऱ्यांकडून निषेध

नगराध्यक्षांच्या विरोधात आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन
कराड (प्रतिनिधी) -कराड शहरातील अतिक्रमण मोहीम व हॉकर्स झोन संदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पालिकेचे मुकादम व कर्मचारी यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले. या निषेधार्थ पालिका कर्मचारी उद्या, दि. 16 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. नगराध्यक्षांचे वक्तव्य निषेधार्ह असून जोपर्यंत त्या पालिका कर्मचाऱ्यांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
कराड शहरातील अतिक्रमण मोहिमेत अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हॉकर्सचा प्रश्न ऐरणीवर आला. मोहीम राबवण्याच्या कार्यपध्दतीविरोधात शहरातील व्यापारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. या पार्श्वभूमीवर पालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांनी बोलावली होती. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानंतर दि. 13 रोजी सायंकाळी 6 वाजता पालिकेच्या सभागृहात विशेष सभा पार पडली. त्यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे सदस्यांच्या रडारवर होते.
शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मुख्याधिकारी डांगे यांनी शहरातील व्यापारी, नागरिकांचे मोठे नुकसान केल्याचा आरोप उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, नगरसेवक विनायक पावसकर, फारूख पटवेकर, सौरभ पाटील व नगरसेवकांनी केला. दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील नागरिकांची माफी मागावी, असे सांगत, ज्या पध्दतीने पालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणे हटवली, त्यांना हे अधिकार कोणी दिले, असा प्रश्न नगराध्यक्ष शिंदे यांनी केला. यावेळी पालिका मुकादम व कर्मचारी यांच्याविषयी त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले.
याबाबतचे वृत्त दैनिक प्रभातमध्ये प्रसिध्द होताच संतप्त पालिका कर्मचाऱ्यांनी रविवारी पालिकेत जाऊन नगराध्यक्षांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. घोषणाबाजीही करण्यात आली. दि. 16 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे जाहीर करत, तसा फलक पालिकेत लावला. नगराध्यक्षांचे वक्तव्य निषेधार्ह असून जोपर्यंत त्या पालिका कर्मचाऱ्यांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
मला टार्गेट करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना चुकीच्या पध्दतीने फितवण्याचे काम सध्या सुरू आहे. मी नम्र विनंती करते की, कर्मचारी बंधू व भगिनींनी या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. नगराध्यक्ष म्हणून मी सदैव कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात बरोबर आहे आणि भविष्यातही राहणार आहे. आपल्याला ज्यांनी फितवले, ते दोन-तीन महिन्यांनी जातील. दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेत जो प्रकार घडला, त्याबाबत अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. त्या अनुषंगाने मी सभागृहात बोलले होते. ते कर्मचाऱ्यांना धरून नव्हते.
रोहिणी शिंदे, नगराध्यक्ष, कराड नगरपरिषद





