भंडारा : भंडारा जिल्ह्यातील सरकारी मालकीच्या मॅंगनीज ओर (इंडिया) लिमिटेडच्या चिखला खाणीत बुधवारी स्लॅब कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एक कामगार जखमी असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. मृत इसमांची नावे विजय नंदलाल (वय 50 वर्ष) रा. खरपडी तिरोडी, अरुण जीवनलाल चोरमार (वय 41 वर्ष) रा. सीता सांगवी अशी असून शंकर सहदेव विश्वकर्मा रा. सीता सावंगी (वय 56 वर्ष) हा जखमी आहे. हे तिघेही स्थायी कामगार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, चिखला मोइल वर्टीकल दोन अंडरग्राउंड लेव्हल ३ मध्ये १०० मिटर खोलीवर काही कामगार काम करत असताना सकाळी ९ वाजेच्या सुमारास येथील स्लॅब कोसळला. यावेळी तीन कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर शंकर विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, नंदलाल हे मध्य प्रदेशातील खरपाडिया येथील रहिवासी होते, तर अन्य दोन कामगारांचे मूळ महाराष्ट्रातील आहेत. दरम्यान, दोन्ही कामगारांचा मृतदेह बाहेर काढून तुमसर येथे पोस्टमार्टम करिता रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. तातडीने या घटनेची माहिती मृत, जखमींच्या नातेवाईकांना दिली गेली. मोठ्या संख्येने लोक या परिसरात गोळा झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलिस, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.