मालीमध्ये सोन्याची खाण कोसळली; डझनभर कामगारांचा मृत्यू, ४२ जखमी

बामाको, (माली) : मालीच्या पुर्वेकडील केनिएबा जिल्ह्यात एक सोन्याची खाण कोसळून झालेल्या दुर्घटनेत डझनभर कामगार ठार झाले आहेत. तर इतर अनेक कामगार जखमी झाले आहेत. मालीमध्ये या वर्षात झालेली ही दुसरी मोठी खाण दुर्घटना आहे. केनिएबा जिल्ह्यातल्या बिलाली कोटो भागातली सोन्याची खाण शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक कोसळली.
या दुर्घटनेत किमान ४२ कामगार ठार झाले आणि इतर अनेक जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहीती मिळते आहे. या भागातील सरकारी प्रवक्त्याने या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या खाणीचे व्यवस्थापन चिनी व्यक्तीकडून केले जात होते. ही खाण कायदेशीर होती, का हे तपासले जात आहे.
मालीमध्ये महिन्यापुर्वीच अशीच एक खाण दुर्घटना घडली होती. दिनांक २९ जानेवारी रोजी झालेल्या भूस्खलनामध्ये सोन्याच्या खाणीत खोदकामासाठी गेलेल्या काही कामगारांचा मृत्यू झाला होता. कौलिकोरो भागातल्या या दुर्घटनेमध्ये बहुतेक कामगार महिला ठार झाल्या होत्या.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये देखील राजधानी बामाको जवळच सोन्याची एक बेकायदेशीर खाण कोसळल्यामुळे ७० पेक्षा जास्त लोक ठार झाले होते. पैसासाठी कट्टरवाद्यांकडून उत्तर मालीमध्ये चालवल्या जाणाऱ्या अनेक बेकायदेशीर खाणींमध्ये अशा दुर्घटना घडत असतात.


