Nagar | मुरकुटे – लंघे यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या बैठका

नेवासा, (प्रतिनिधी) – शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेवासा तालुक्याचे भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनी नेवासा मतदार संघातील प्रत्येक गट आणि गणनिहाय बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आ.मुरकुटे आणि जिल्हाध्यक्ष लंघे पाटील कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
महायुती सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना राबविल्या. शेतकऱ्यांचे वीजबिलही माफ करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माता-भगिनींना प्रतिमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
सन २०२३ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील ८८ कोटी रुपयांचा पिक विमा शासनाने मंजूर केलेला असून, त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे. महायुती सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन बैठकीत करण्यात येत असून, बैठकांना कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष लंघे यांनी सांगितले





