सातारा-पंढरपूर रस्त्यावरील माहुलीच्या कृष्णा पुलाचे काम संथ गतीने

सातारा : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथे पर्यटकांच्या वजनाने पूल कोसळून पर्यटक इंद्रायणी पात्रात वाहून गेल्याची दुर्घटना घडली. यामुळे महाराष्ट्रातील जुन्या फुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातारा शहराजवळ कृष्णा नदीच्या पुलाला ११० वर्षे पूर्ण होऊनही त्याला अद्याप पर्यायी पुलाची व्यवस्था झाली नाही. प्रशासनाकडून टेंडर झाले, निधी मंजूर झाला. मात्र, पर्यायी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
माहुलीजवळील या ब्रिटिशकालीन पुलावरून वाहने जाताना अजूनही काळजाचा ठोका चुकायला होते आहे. त्यामुळे वाहतूक सुरक्षितता तेथे टांगणीला लागत असून पर्यायी मार्ग तातडीने सुरू केले जावेत, अशी मागणी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी केली आहे.
सातारा-पंढरपूर महामार्गावरील कृष्णा नदीचा पूल हा साताऱ्यातून कोरेगावमार्गे पंढरपूरकडे जाताना प्रवासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. या पुलाला ११० वर्षे झाली असून गुळ, चुना अशा मिश्रणातून हा पूल बांधला गेला आहे. मात्र, कृष्णा नदीचा परिसर आणि येथील वातावरणाचा परिणाम होऊन पुलाच्या पायाकडील चिरा निसटू लागल्या आहेत. त्यामुळे हा पूल इतिहासजमा करून तातडीने नवीन पूल बांधला जावा अशी बऱ्याच वर्षाची मागणी आहे.
कोरेगावच्या दिशेने जाताना कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या डाव्या बाजूने नव्या पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. या कामासाठी आठ कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये फक्त पुलाच्या पिचिंगचे काम प्राथमिक टप्प्यामध्ये आहे आणि येथे एकच पिलर उभा करण्यात आला आहे. या गतीने पुलाचे पुढचे काम पूर्ण होण्यासाठी किमान पाच वर्षे लागतील, अशी खंत राजेंद्र चोरगे यांनी पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
ब्रिटिशकालीन पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्याची माहिती ठेकेदार कंपनीने महाराष्ट्र शासनाला कळवली आहे. या पुलाला कधीही धोका निर्माण होऊ शकतो. हा पूल मोडकळीला आल्यास जिल्ह्यातील पूर्व भागाचा संपर्क तुटू शकतो. यामुळे होणारी मानवीहानी आणि आर्थिक नुकसान कल्पना करण्याच्या पलिकडची आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच तातडीने यावर उपाययोजना व्हाव्यात, अशी कळकळीची मागणी चोरगे यांनी या पत्रात केली आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी राजेंद्र चोरगे यांनी याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाने प्राधान्य देऊन माहुली येथील पुलाचे बांधकाम करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराला स्मरणपत्र देऊन कामात गती आणावी आणि नवीन पुलाचे काम लवकरात लवकर मजबूत कसे होईल याबाबतही निर्देश द्यावेत, भविष्यात होणारे अपघात व नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने दक्ष असावे, अशी अपेक्षा या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.



