साताऱ्यातील कृष्णा पुलाच्या मजबुतीकरणाला धोका

संदीप राक्षे / सातारा : सातारा कोरेगाव रस्त्यावरील कृष्णा नदीच्या पुलाला 115 वर्ष पूर्ण झाली आहे. या पुलाचा वापर कालावधी पूर्णतः संपला आहे, तरीसुद्धा सातारा कोरेगाव आणि तेथून पुढील सोलापूरच्या प्रवासाला या पुलाशिवाय पर्याय नाही. या पुलाचे मजबुतीकरण केले जावे अन्यथा जुन्या पुलाच्या समांतर पुलाचे काम तातडीने सुरू करावे, अशी सातारकरांची मागणी आहे. मात्र, नव्या पुलाचे काम लाल फितीच्या कारभारात अडकून पडले आहे.
सातारा ते कोरेगाव पुसेगाव , म्हसवड, पंढरपूर, सोलापूर या मार्गावरील कृष्णा नदीवरील पूल हा दैनंदिन दळणवळण यासाठी महत्त्वाचा आहे .हा फुल ब्रिटिश कालीन असून तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विल्सन यांच्या हस्ते 27 जून 1915 रोजी या पुलाचे लोकार्पण झाले म्हणून या पुलाची विल्सन ब्रिज अशी जुन्या दस्तऐवजांमध्ये नोंद आहे .या पुलाचा वापर कालावधी संपूनही नवीन पूल उभारण्यात न आल्याने हा पूल अद्याप वापरात आहे
.
या पुलाच्या दगडी कठड्याच्या चिरा सटकण्याच्या बेतात असून हा पूल धोकादायक आहे तसेच पुलाच्या भिंतीवर जुनी पिंपळाची झाडे वाढली असून पुलाच्या मजबुतीकरणाला धोका निर्माण झाला आहे . याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांच्याकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही या पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
कृष्णा नदीच्या नवीन पुलाची अडचण अशी आहे की सातारा सोलापूर या राज्य मार्गाचे आता महामार्गात रूपांतर झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा रस्ता वर्ग झाला आहे. महामार्गाचे काम पूर्णत्वास आले असून कृष्णा पुलासह अन्य सहा पुलांची कामे शिल्लक आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुंडमळा पुलाच्या दुर्घटनेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ब्रिटिशकालीन पुलांचे तसेच अतिधोकादायक पुलांचे ऑडिट करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र, कृष्णा पुलाची अडचण ही आहे, की राष्ट्रीय महामार्गाचे कार्यक्षेत्र असल्यामुळे हे प्रकरण तेथील यांत्रिक विभागाकडे वर्ग झाले आहे. त्यांच्याकडून अद्याप याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
तांत्रिक घोळ अडचणीचा ठरला
जुन्या कृष्णा पुलाला समांतर असा नऊ मीटर उंचीचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. ठेकेदाराने मात्र माहुलीच्या जुन्या पुलाजवळ एक मोठा पिलर बांधून ते काम तसेच ठेवले आहे. याबाबत बांधकाम विभागातून माहिती घेतली असता नव्या दरवाढीप्रमाणे नव्याने निविदा काढावयाची असल्याच्या कारणावरून हे पुलाचे काम रेंगाळल्याचे समोर येत आहे. हा तांत्रिक घोळ अडचणीचा ठरला आहे .त्यामुळे सध्या सातारा-सोलापूर प्रवास हा जुन्या पुलावरूनच करावा लागत आहे.





