nagar | हिंदू समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी व सामर्थ्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे काम

नगर, (प्रतिनिधी) – श्रीराम जन्मभूमीचे आंदोलन हे हिंदू अस्मितेचे आंदोलन होते. या आंदोलनामुळेच विश्व हिंदू परिषदेची पूर्ण जगात ओळख निर्माण झाली.
या आंदोलनामुळे पूर्ण देशत मोठे परिवर्तन झाले असून हिंदूंचा अपमान करून कोणीही यशस्वीपणे राजनीती करू शकणार नाही, अशी ताकद निर्माण झाली आहे. ही विश्व हिंदू परिषदेचे कार्याची उपलब्धी आहे. आता हिंदू समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी व सामर्थ्यशाली होण्यासाठी विहिंप काम करत आहे.
या माध्यमातून हजारो नागरिकांना विहिंपने रोजगार निर्माण करून देत पायावर उभे केले आहे. त्यामुळे सेवा घेणारे हात आता सेवा देणारे झाले आहेत, हे समाज परिवर्तन होताना दिसत आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले.
विश्व हिंदू परिषदेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त नगरमध्ये आयोजित हिंदू संमेलना मध्ये विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समर्थभक्त मोहनबुवा रामदासी व मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी यांचे आशीर्वाचन झाली.
या संमेलनास विहिंपचे प्रांत धर्माचार्य प्रमुख ह.भ.प माधव राठी महाराज, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, जिल्हा मंत्री अनिल जोशी, विभाग मंत्री सुनील ख्रिस्ती, जिल्हाध्यक्ष अॅड. जयदीप भोसले, प्रांत सहमंत्री सतीश गोरडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक सचदेव, बजरंग दल संयोजक कुणाल भंडारी आदींश मोठ्या संख्यने नागरिक व महिला उपस्थित होते.
मिलिंद परांडे पुढे म्हणाले, जुन्या काळापासून चालत आलेल्या सामाजिक कुरीतींपासून समाजास मुक्त करून हिंदू समाजास निर्दोष, शोषण मुक्त, ज्ञानवान, कर्तृत्ववान होण्यासाठी आता काम केले जात आहे. हिंदू तत्त्वज्ञान खूप श्रेष्ठ आहे.
पण याचे पालन न करण्यामुळे व जाती भेदभावपूर्ण आचारणामुळे हिंदू धर्म आतून कमजोर होत चालला आहे.
मोहनबुवा रामदासी म्हणाले, विश्व हिंदू परिषदेचे कार्य हे ईश्वर निर्मित,प्रेरित व ईश्वरानेचे सुरु केलेलं कार्य असल्याने गेले ६० वर्ष अखंड हे कार्य सुरु आहे. देव, देश व धर्माचे अधिष्ठान असल्याशिवाय कोणतीही संघटना व कार्य असे अखंडितपणे टिकत नाही, हे विश्व हिंदू परिषदेने सिद्ध केले आहे.
राजाभाऊ कोठारी म्हणाले संपूर्ण भारतात हिंदू धर्मासाठी विशुद्ध परिषद सर्वात अगोदर पुढे आली आहे. अनेक प्रश्न व समस्यांना समस्यांवर मात करत विश्व हिंदू परिषदेचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे.
हिंदू धर्मावर आज सर्व बाजूंनी आक्रमणे अत्याचार होत आहेत. जर आज हिंदू जागा नाही झाल्यास उद्याचे भवितव्य अंधारमय आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी भगव्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आव्हान त्यांनी केले.





