Women Asia Cup : आशिया कप जिंकला, पण ट्रॉफी स्विकारण्यास नकार; दुबईतील VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Women Asia Cup : सामन्यानंतर पार पडणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे दुबईच्या मैदानावर वेगळाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Women Asia Cup : दुबईच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत महिला आशिया चषक २०२६च्या जेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल ७२ धावांनी पराभव करत आशिया चषकावर कब्जा केला. मात्र, सामन्यानंतर पार पडणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे दुबईच्या मैदानावर वेगळाच हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी प्रदान करण्यात येणार होती. मात्र, भारतीय खेळाडूंनी त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर टीम इंडिया पुरस्कार सोहळ्यातून बाहेर पडून ड्रेसिंग रूमकडे रवाना झाल्याचे दिसून आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानावर विजयाचा आनंद साजरा करत होता. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी सुरू झाली. मोहसीन नक्वी स्टेजवर उपस्थित होते. भारतीय संघाला त्यांच्या हस्ते आशिया चषक प्रदान केला जाणार होता.
याचवेळी भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना पुरस्कार वितरणाच्या ठिकाणी आली. मात्र, स्टेजवर मोहसीन नक्वी उपस्थित असल्याचे दिसताच ती तेथून माघारी फिरली आणि थेट ड्रेसिंग रूममध्ये गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी आणि पदके स्वीकारली की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, सामन्याचा विचार केला तर भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १८३ धावा केल्या. भारताच्या डावाची सुरुवात स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी आक्रमक खेळीने झाली. दोघींनी अवघ्या १२.५ षटकांत १२९ धावांची तुफानी सलामी दिली. या भागीदारीसह महिला टी-२० आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च सलामीच्या भागीदारीचा विक्रमही भारताच्या नावावर झाला आहे.
शफाली वर्माने अवघ्या २४ चेंडूंत अर्धशतक झळकावत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाची नोंद केली. तिने ३९ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची स्फोटक खेळी केली.
Mohsin Naqvi was standing on the podium to present the trophy. When Smriti Mandhana came out and saw him standing there, she went back into the dressing room.😂🔥🔥🔥 pic.twitter.com/al1fQ6wXu5
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) September 13, 2026
१८४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात मात्र अडखळती झाली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. अखेर श्रीलंकेचा संपूर्ण संघ २०व्या षटकात अवघ्या १११ धावांवर गारद झाला.





