महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाकडून गंभीर दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या, “अत्यंत संतापजनक…”

फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी डॉक्टरने तळहातावर सुसाईड नोट लिहून दोन जणांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपींमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल:
या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत “अशी घटना घडणे हे अत्यंत संतापजनक आहे,” असे म्हटले आहे.
कारवाईचे आदेश आणि तपास सुरू:
टीव्ही ९ मराठीशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके बीड आणि पुणे या भागात रवाना झाली आहेत. चाकणकर यांनी स्वतः सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती दिली.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) October 24, 2025
‘दोषींवर कारवाई करणार’:
चाकणकर यांनी नमूद केले की, मृत डॉक्टर आणि पोलिसांमध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रारी होत्या. यामागचे कारण काय होते, याची सविस्तर माहिती लवकरच समोर येईल. त्यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणात ज्या यंत्रणांनी दुर्लक्ष केले असेल, त्यांच्यावर देखील कारवाई होण्यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल.
आरोपींपैकी एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक इंजिनिअर असून, दोघेही एकाच तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस तपासातून या प्रकरणातील अधिक माहिती आणि सत्य लवकरच समोर येईल.
मृत डॉक्टरने तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी तिच्यावर पाच वेळा बलात्कार केल्याचं आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी चार महिने शारीरिक व मानसिक छळ केल्याचं म्हटलं आहे.





