Swiss Open 2022 : पी.व्ही. सिंधूने पटकावलं विजेतेपद

बॅसेल – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हीने रविवारी स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानवर 21-16, 21-8 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सिंधूने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावला. पहिल्या गेममध्ये सिंधूने बुसाननच्या कडव्या प्रतिकाराचा सामना केला व आपल्या सर्व्हिस राखून पहिली गेम 21-16 अशी जिंकली.
दुसरी गेम मात्र, सिंधूच्या जोरदार स्मॅशने गाजली. तीने बुसाननला फारशी संधीच दिली नाही व ही गेम तीने 21-8 अशी सहज जिंकत विजेतेपद पटकावले. हा सामना सिंधूने अवघ्या 49 मिनिटांत जिंकत बुसाननविरुद्धची विजयाची मालिका कायम राखली.
या दोघींमध्ये आजवर झालेल्या 17 सामन्यांतील सिंधूचा हा 16 वा विजय ठरला होता. 2019 साली सिंधूला बुसाननने हॉंगकॉंग ओपन स्पर्धेत पराभूत केले होते. त्यानंतर तीला सिंधूचा पराभव करण्यात एकदाही यश आलेले नाही.





